
आंबोलीच्या इतिहासात एवढा कमी पाऊस कधीच झाला नाही आंबोलीत यावर्षी फक्त 108 इंच पाऊस!
*सर्वाधिक पाऊस ज्या ठिकाणी होतो, त्यामध्ये आंबोली हे एक ठिकाण आहे. पावसाळी हंगामात आंबोलीत सरासरी 300 ते 350 इंच ( सरासरी 8500 ते 9000 मिमी) एवढा पाऊस कोसळतो. या ठिकाणी ब्रिटिशांनी बसवलेल्या पर्जन्यमापक यंत्रावरील गेल्या दीडशे वर्षांतील ही नोंद आहे. यात कमी-अधिक 50 मिमी. चा फरक दरवर्षी असतो. तीन वर्षापूर्वीतर 450 इंच पावसाची नोंद आंबोलीत झाली होती. मात्र यावर्षी आंबोलीत केवळ 2754.7 मिमी. (108 इंच) पावसाची नोंद झाली आहे. नवीन सोलार आधारित पर्जन्यमापक यंत्रावर झालेली ही नोंद गोंधळात टाकणारी व अविश्वसनीय आहे. या वर्षी झालेला पाऊस पाहता व गेल्या 100 वर्षातील आंबोलीच्या पावसाची सरासरी पाहता 200 मिमी. पावसाची घट शक्य नसल्याचे स्थानिक जानकारांचे म्हणणे आहे.
यावर्षी 12 मे 2025 पासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. तर मान्सूनचे जिल्ह्यात अधिकृत आगमन मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात झाले. तेव्हापासून ऑक्टोबरपर्यंत आंबोलीत सलग दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे यंदा सरासरी पावसाची विक्रमी नोंद होण्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनाच्या आकडेवारीनुसार आंबोलीतील सरासरी पावसाची नीचांकी नोंद झाली असून हे संभ्रमात टाकणारे चित्र आहे. खरेतर ज्या प्रकारे मे ते ऑक्टोबर या कालावधीत आंबोलीत झालेला पाऊस पाहता एवढा कमी पाऊस अशक्य असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
आंबोलीतील कोसळणारा पाऊस कधीच सारखा नसतो. कधी हलका, मध्यम, निवांत, जोरदार, अतिजोरदार, मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टी, ढगफुटी अशी पावसाची अनेक रूपे आंबोलीत पहावयास मिळतात. या पावसाचा आनंद घेण्यासाठीच लाखो पर्यटक आंबोलीत येत असतात. मात्र, यावर्षी पर्जन्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत आंबोलीतील आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजे फक्त 2754.7 मिमी.(108इंच) पावसाची नोंद झाली आहे.
आंबोलीच्या इतिहासात एवढा कमी पाऊस कधीच झालेला नाही. दरवर्षी आंबोली परिसरात सुमारे 320 इंच (8128 मीमी) ते 400 इंच (10,160 मीमी) एवढा पाऊस जून ते सप्टेंबर ह्या 4 महिन्या पडतो. शेकडो वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बसवलेल्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे झालेली ही अचूक नोंद आहे. मॉन्सूनच्या सुरुवातीच्या जून, जुलै व ऑगस्ट या प्रत्येक महिन्यात 100 इंच (2540 मीमी) हून अधिक पावसाची नोंद ही एका महिन्यातच होत असायची. तसेच दरदिवशी कमीत कमी 4 (101.6 मीमी) ते 5 इंच (127 मीमी) तर जास्तीत जास्त 18 इंच (457.2 मीमी) पावसाची नोंद झाल्याचे आकडे उपलब्ध आहेत. यंदाही कमी अधिक फरकाने दरवर्षीप्रमाणेच पाऊस कोसळला होता. त्यामुळे या वर्षी झालेली 108 मिमी. पावसाची नोंद विश्वसनीय नाही. हा सर्व नवीन सौर ऊर्जेवर चालणार्या सदोष पर्जन्य मापक यंत्राचा परिणाम असल्याचे जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे. जर जुन्या ब्रिटिश कालीन पर्जन्यमापक यंत्राद्वारे पावसाची योग्य नोंद झाली असती तर असा फरक आला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आंबोलीत पावसाळी हंगामात झालेला पाऊस
यात जून 979 मिमी. (38 इंच), जुलै 942.1मिमी. (37 इंच), ऑगस्ट 848.2 मिमी.(33 इंच) व सप्टेंबर (25) 106.4 मिमी. (4.18 इंच) अशी पावसाची नोंद झाली आहे.
सौर ऊर्जेवरील पर्जन्यमापक यंत्र सदोष !
ब्रिटिशांनी सुमारे 150 वर्षांपूर्वी आंबोलीतील सनसेट पॉइर्ंट येथे योग्य ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसवले होते. मात्र सदर परिसरातील जमीन एका पुढार्याने खरेदी केली. त्या या जागेत बांधकाम करायचे असल्याने हे ऐतिहासिक असे ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक यंत्र काढण्यात आले. त्यानंतर प्रशासनाकडून गत गतवर्षी सौर ऊर्जेवर चालणारे पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आले. मात्र सदर यंत्र सदोष असून त्यात पावसाची अचूक नोंद होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंबोलीत पूर्वीच्या जागेवरच ऑफलाईन पद्धतीने पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची मागणी आंबोली ग्रामस्थ व व्यावसायिक करत आहेत.




