
महायुतीत महाभारत! सुनील तटकरेंचा अत्यंत जवळचा माणूस शिवसेनेत, भरत गोगावले यांची मोठी राजकीय खेळी!
रायगड : रायगड जिल्ह्यात महायुतीतील दोन प्रमुख घटकपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संघर्ष चिघळू लागला आहे. पालकमंत्री पदाच्या वादातून सुरू झालेली कुरघोडी आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट आमनेसामनेच्या लढाईत रुपांतर झाल्याचे चित्र आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे. खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गायकवाड यांच्या प्रवेशाने रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांपूर्वी ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे.
गोरेगाव विभागातील सुनील तटकरे यांचे कार्यकर्ते विकास गायकवाड हे सुनील तटकरे यांचे विश्वासू शिलेदार मानले जात होते. त्यामुळे गायकवाड यांची गळचेपी म्हणजे तटकरे यांच्यासाठी थेट वैचारिक आणि संघटनात्मक हादरा मानला जातोय. या प्रवेश सोहळ्यावेळी भरत गोगावले यांनी सूचक भाष्य केलं. “राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास जिल्ह्याचं चित्रच बदलू शकतं,” असं त्यांनी वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्या पुढील रणनीतीबाबतही संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, महायुतीत असूनही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतच महाभारत रंगण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत.
राजकीय वर्तुळात सध्या याच चर्चेला उधाण आले असून, “तटकरे-गोगावले संघर्ष” हे आगामी निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्यात आता केवळ पक्षांतराचे नव्हे, तर वर्चस्वाच्या रणधुमाळीचे दिवस सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, फक्त रायगड नाही तर अनेक ठिकाणी महायुतीत धुसफूस सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. सोलापुरात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन माजी आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. दुसरीकडे पुण्यात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजप नेत्यांवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप केले जात आहेत.




