रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून सर्व परवानाधारक फटाका विक्रेते व स्टॉलधारक तसेच फटाक्यांचे स्टॉल उभारणाऱ्या सर्व व्यक्तींना सूचना

रत्नागिरी जिल्ह्यात दीपावलीचा सण उत्साहात साजरा होत असून शहरातील बाजारपेठांमध्ये तसेच विविध दुकानांसमोर छोटे फटाक्यांच्या स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत असून फटाक्यांमधील स्फोटक पदार्थामुळे अपघात होण्याची तसेच जीवित व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून सर्व परवानाधारक फटाका विक्रेते व स्टॉलधारक तसेच फटाक्यांचे स्टॉल उभारणाऱ्या सर्व व्यक्तींना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :

१. फटाक्यांची विक्री व साठवणूक करण्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे.

२. या परवान्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

३. परवान्याविना फटाक्यांचा स्टॉल उभारणे हा दंडनीय गुन्हा असून त्याबाबत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

४. विनापरवाना धारक फटाका स्टॉल आढळून आल्यास, संबंधित स्टॉलधारकावर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 288 तसेच Explosive Substances Act, 1884 चे कलम 9 (B), 1(B) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

५. फटाक्यांच्या विक्री व साठवणीसाठी अधिकृत परवाना घेतलेल्या सर्व स्टॉल धारकांनी आपला परवान्याची प्रत त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावी.

६. परवानाधारक स्टॉलधारकांनी आपल्या स्टॉलवर आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवून स्फोटक पदार्थांमुळे होणाऱ्या अपघातांपासून जीवित व मालमत्तेचे रक्षण होईल याची खबरदारी घ्यावी.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून “दिवाळी” सण आनंदात, उत्साहात व जबाबदारीने साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करण्याचे तसेच सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सर्वांनी मिळून सुरक्षित व आनंदी “दिवाळी” साजरी करूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button