
दोनिवडे येथे बीएसएनएलचे टॉवर वर्षभरानंतरही बंदच
संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेत
राजापूर : तालुक्यातील दोनिवडे येथे भारत संचार निगम लिमिडच्या वतीने (बीएसएनएल) टॉवर उभारून एक वर्षे होत आले, तरी अद्यापही कार्यान्वित करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील दोनिवडेच्या सहयोग प्रतिष्ठानतर्फे याबाबत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. नुकतेचे या संघटनेच्या वतीने भारत संचार निगम लिमिटेड रत्नागिरीचे व्यवस्थापक यांना निवेदन दिले असून ३१ ऑक्टोबरपर्यंत टॉवर चालू करण्याची मागणी केली आहे.
दोनिवडे येथे बीएसएनएल कंपनीचे टॉवरचे काम जानेवारी २०२५ मध्येच पूर्ण झालेले असून, आता कमीत कमी १ वर्ष होत आले आहे. तरी अद्यापही हे टॉवर चालू झालेले नाहीत. याबाबत ग्रामस्थांकडून तसेच ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा
करून देखील टॉवर चालू होण्याबाबत कार्यालयाकडून काहीच तत्परता दाखविण्यात आलेली नाही किंवा कोणतीही माहिती ग्रामस्थांना दिलेली नाही. त्यामुळे टॉवर संबधित कामकाजाबाबत ग्रामस्थामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हा टॉवर लवकरात लवकर चालू होण्यासंदर्भात दखल घ्यावी. तसेच टॉवरचे रखडलेले कामकाज ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण न झाल्यास तसेच
टॉवर कार्यान्वित न झाल्यास गावातील ग्रामस्थांकडून बीएसएनएल कार्यालयासमोर
उपोषण करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी, असे बीएसएनएल कंपनीला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
हे निवेदन खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना पाठविण्यात आली आहेत. निवेदन सादर करताना सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत गुरव, उपाध्यक्ष विष्णू शिरवडकर, सचिव अमोल करटकर, प्रवीण तोरस्कर, अमित पडवळ यांच्यासहीत संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.




