
ठाण्याच्या प्रशांत कॉर्नर या मराठी माणसाच्या दुकानात खास सोन्याचा वर्ख असलेली मिठाई मिळते फक्त ५० हजार रुपये किलो…
ठाण्यात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला प्रशांत कॉर्नर हे मिठाईचं दुकान ठाऊक नाही असं होणं अशक्य आहे. तुम्ही रिक्षा चालकाला विचारा किंवा अगदी प्राप्तीकर विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला विचारा.प्रशांत कॉर्नरची ख्याती सर्वदूर पसरली आहे. अनेक जण तुम्हाला प्रशांत कॉर्नर नावाचं गोड साम्राज्य कसं उभं राहिलं ते सांगतील. कुणी सांगेल प्रशांत कॉर्नर उभं करणारे प्रशांत सकपाळ हे दूध विकायचे, कुणी सांगेल दारोदार जाऊन अंडी विकायचे. होय प्रशांत कॉर्नर या मिठाई दुकानाच्या मागे ठामपणे उभं असलेलं नाव हेच आहे प्रशांत सकपाळ. प्रशांत कॉर्नरचा पसारा वाढला आहे. त्यामुळे आता हे मिठाईचं दुकान ठाण्यातच नाही तर पनवेल, खारघर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडीतही सुरु झालं आहे.प्रशांत कॉर्नर चं गोड साम्राज्य कसं उभं राहिलं याची कहाणी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. एक काळ असा होता की प्रशांत सकपाळ यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यांनी हळूहळू हा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला प्रशांत सकपाळ हे एकच मिठाई विकत असत. प्रशांत सकपाळ यांचा जन्म एका गरीब घरातला. वयाच्या आठव्या वर्षी प्रशांत सकपाळ यांनी घरच्या परिस्थितीमुळे किराणा दुकानात काम करण्यास सुरुवात केली होती.प्रशांत सकपाळ यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, मी दुसरीत होतो तेव्हापासून किराणा दुकानात काम करत होतो. काही वेळा किराणा दुकानाचा मालक माझा अपमान करायचा, अनेकदा ओरडायचा. मी तेव्हाच मनाशी खुणगाठ बांधली होती की एक दिवस असा येईल की आपल्या मालकीचं आपलं असं दुकान असेल. सध्या वागळे इस्टेट भागात एक लाख स्क्वेअर फूट भागात प्रशांत कॉर्नरची मिठाई तयार करणारी फॅक्टरी आहे. सातवी शिकून शाळा सोडलेल्या प्रशांत सकपाळांनी मिठाईचं हे गोड साम्राज्य त्यांच्या मेहनतीवर उभं केलं आहे. सुरुवातीच्या काळात दूध विकण्यापासून, अंडी विकण्यापासून अनेक छोटे मोठे व्यवसाय त्यांनी केले. आता ते रोज ८ ते १० हजार लिटर दूध विकत घेतात. त्यातून बनते प्रशांत कॉर्नरची खास चव असलेली लज्जतदार मिठाई. जी मिठाई तयार होते ती रोज एका छोट्या लॅबमध्ये तपासली जाते आणि त्यानंतरच ती दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येते.तुम्ही इतकं सगळं कसं काय करु शकलात? असं विचारलं असता प्रशांत सकपाळ म्हणतात हे सगळं श्रेय कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंचं आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी व्यवसाय सुरु केला पाहिजे याची प्रेरणा त्यांनी दिली. १९७८ चा गुढी पाडवा होता, बाळासाहेबांचे शब्द माझ्या कानात घुमत होते, मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे असं ते कायम सांगत. १९७८ मध्ये मी ६०० रुपयांची गुंतवणूक करुन एक टपरीवजा दुकान सरस्वती शाळेजवळ सुरु केलं होतं. आनंद दिघेंनी मला आशीर्वाद दिला. या ठिकाणी मी अंडी, बिस्किटं, ब्रेड, सिगारेट, विडी, तंबाखू या गोषअटी विकत असे. पारले जी बिस्कीट त्या काळी ९० पैशांना मिळायचं. मी त्यावेळी १४ वर्षांचा होतो. त्यानंतर आणखी काही वर्षे गेली. १९८९ मध्ये मी माझी टपरी पाचपाखाडी भागात नेली. तिथे मी सुका मेवाही विकू लागलो. माझं दुकान चालत होतं. शिवाय माझी टपरी जिथे होती तिथे वळण होतं त्यामुळे लोक या वळणाला प्रशांत कॉर्नर असं म्हणू लागले. पण त्यानंतर रस्ता रुंदीकरण सुरु झालं आणि मी पुन्हा शून्यावर आलो. काही ग्राहकांनी मला पैसे उसने दिले, मी माझं घर विकलं आणि बँकेचं कर्ज घेतलं. त्या सगळ्या पैशांतून मी ३०० स्क्वेअर फुटांचा एक गाळा पाचपाखाडीमध्ये विकत घेतला. त्यावेळी मी सुका मेवा आणि इतर गोष्टी विकत असे. खंडेलवाल मिठाई माझ्या शेजारीचं होतं. त्या काळी खंडेलवाल मिठाई हे खूप मोठं नाव होतं. मला त्यावेळी कायमच वाटत असे की आपलं असं दुकान असलं पाहिजे. ज्यानंतर मी माझ्या दुकानात मिठाई विकण्यास सुरुवात केली.
प्रशांत कॉर्नर २००० मध्ये सुरु झालं
प्रशांत सकपाळ म्हणाले आमच्यासाठी ग्राहक सर्वप्रथम आहेत. त्यांच्याकडून मिठाईबाबत तक्रार आली तर आम्ही ती पूर्वीही विचारात घ्यायचो आणि आजही विचारात घेतोच. शिवाय आमच्याकडे मिठाई तयार करणारे जे कारागीर आहेत ते दिल्ली, पंजाब, लखनऊ, कोलकाता येथील आहेत. त्यांना मिठाई बनवण्याची समज जास्त चांगली आहे. २००० मध्ये मी पहिल्यांदा प्रशांत कॉर्नर या नावाने मिठाईचं दुकान पाचपाखाडीत सुरु केलं. त्यावेळी मी १२ प्रकारच्या मिठाई विकत असे. आता दुकानाचा पसारा बराच वाढला आहे.
सुवर्ण मिठाईची कल्पना कशी सुचली?
आम्ही आमच्या दुकानात मोसमाप्रमाणे बर्फी किंवा मिठाई ठेवतो. हिवाळ्यात आमच्याकडे संत्रा बर्फी मिळते. संक्रातीच्या वेळी गजक मिळतात. उन्हाळ्यात आमरस मिळतो. मग दिवाळीला आपल्याला काय खास ठेवता येईल? यातून समोर आली सुवर्ण मिठाईची कल्पना. सध्या आमच्याकडे जी सुवर्ण मिठाई आहे ती ५० हजार रुपये किलो आहे. दिवाळीच्या दहा दिवसांमध्ये आम्ही काही टन मिठाई विकतो. शुगर फ्री मिठाईसह पाच लाख किलो मिठाई आम्ही या दिवसात विकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तर काजू कतलीची विक्री २ लाख किलो इतकी होते. दिवाळीत आमच्याकडे खास सोन्याचा वर्ख असलेली मिठाई मिळते जी ५० हजार रुपये किलो आहे.




