
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी जिजाऊ ब्रिगेडचा तीव्र निषेध
दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी
चिपळूण : शहरातील एका खाजगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या व्हॅन चालकाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेचा जिजाऊ ब्रिगेडतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक माननीय मेंगडे साहेब यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण हे शांत, संस्कारी आणि सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाते. मात्र १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. एका खाजगी शाळेतील विद्यार्थिनीवर शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने पालक, शिक्षक आणि नागरिक वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
चिपळूण पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा शहरातीलच असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दररोजप्रमाणे शाळा सुटल्यावर विद्यार्थिनीला घरी सोडताना व्हॅन चालकाने विश्वासघात करून अशोभनीय कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांचा शाळा सुरक्षेवरील विश्वास डळमळीत झाला असून, शाळा व शिक्षण संस्थांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला शाळा वाहन सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. तसेच या नराधमाला केवळ शिक्षा नव्हे, तर फाशीची शिक्षा द्यावी अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेड तर्फे निवेदन देऊन मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, मुस्लिम जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा आणि चिपळूण सदस्य सईदा शेख, खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे, तालुका संघटक संध्या घाडगे, दिलबर खान, आशाताई गायकवाड, पूनम भोजने आदी उपस्थित होत्या.
..




