सिनेसृष्टीकडे पहिले पाऊल; चिपळूणमध्ये अभिनय कार्यशाळा

प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांचे मार्गदर्शन; मराठी नाट्य परिषद चिपळूणचे आयोजन

चिपळूण : अभिनयाची आवड असलेल्या तरुणांना आणि इच्छुकांना आता सिनेसृष्टीकडे वाटचाल करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडणार आहे. मुंबई आणि पुण्यात अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर कोकणात प्रथमच ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिली.

ही कार्यशाळा १ आणि २ नोव्हेंबर या दोन दिवसांदरम्यान दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे. कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अभिनय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवकांना कॅमेरा समोर आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी आणि ऑडिशन प्रक्रियेची सखोल माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हे आहे.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये म्हणून कॅमेरा फेसिंग तंत्रज्ञान, ऑडिशन मार्गदर्शन, ॲक्टिंग इम्प्रोवायजेशन तसेच भरपूर प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश आहे. या कार्यशाळेसाठी वयोमर्यादा १५ वर्षांपासून पुढे अशी ठेवण्यात आली असून फी एक हजार रुपये इतकी आहे. सहभागासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करणारे रोहन मापुस्कर हे ‘थ्री इडियट्स’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. तसेच ‘एप्रिल-मे ९९’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘झोंबिवली’, ‘स्माईल प्लीज’, ‘वाळवी’, ‘वेड’, ‘ठाकरे’, ‘सचिन’, ‘आत्मपॅम्प्लेट’, ‘उनाड’, ‘व्हेंटिलेटर’, ‘हिरकणी’, ‘रूपनगर के चिते’ अशा अनेक मराठी चित्रपटांचे ते कास्टिंग डिरेक्टर राहिले आहेत.

त्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अभिनय शिकण्याची आणि सिनेसृष्टीच्या प्रत्यक्ष अनुभवाची संधी कोकणातील नवोदित कलावंतांना मिळणार आहे. कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी योगेश बांडागळे (९९२३४२८८३८) आणि ॲड. विभावरी राजपूत (७७९६७२९५८७) या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.

या कार्यशाळेबाबत माहिती देताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सांगितले की, “या उपक्रमातून कोकणातील अभिनय क्षेत्रातील नवोदितांना योग्य दिशा मिळेल. सुप्त कलागुणांना वाव मिळून सिनेसृष्टीकडे पहिले पाऊल टाकण्यास मदत होईल,” असे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button