ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत आकांक्षा कदमला सुवर्ण, ओम पारकरला रौप्य पदक

रत्नागिरी : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ५९ व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षांच्या मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत सिंधुदुर्गच्या दीक्षा चव्हाणवर १६-१५, ५-१८ व २१-४ असा निसटता विजय मिळवून बाजी मारली. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा आपल्या अनुभवाच्या जोरावर दीक्षा चव्हाणवर वरचढ ठरली. उपांत्य फेरीत आकांक्षा कदम हिने रिची माचीवले (मुंबई) हिचा २१-०० व २१-०० असा सरळ दोन सेट मध्ये प्रराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. १८ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा ओम पारकरवर पुण्याच्या आयुष गरुडने बाजी मारली. त्याने २१-११, १२-२ असा एकतर्फी विजय संपादन केला. ओम पारकर याने उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या मनवार अब्बासवर ५-१८, २१-०० व १७-०४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, सह सचिव केतन चिखले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार व खजिनदार संजय देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.

रत्नागिरीच्या आकांक्षा कदम व ओम पारकर या दोन्ही खेळाडूंची १ नोव्हेंबर २०२५ पासून ग्वालीयर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्यांना रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन व रत्नगिरी जिल्हा कॅरम खेळाडूंतर्फे स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button