
व्हाट्सअप वर आलेले अनोळखी लिंक ओपन केल्याने रत्नागिरी येथे एकाचे खात्यातून 93 हजार रुपये लंपास…
सध्या राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही सायबर क्राईम होण्याचे प्रकारात वाढ होत आहे सायबर चोरटे दरवेळी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असल्याने अनेकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे
ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात माहिती घेत असताना, एका अनोळखी व्हॉट्सॲप नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करणे रत्नागिरी शहरातील एका इसमाला महागात पडले आहे. ही लिंक उघडताच अवघ्या काही क्षणांत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९३ हजार रुपयांची रक्कम सायबर चोरांनी लंपास केली. अजित सदानंद पिलणकर वय ५०, रा. रत्नागिरी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फसवणुकीची ही घटना ऑनलाइन तिकीट बुकिंगसंदर्भात माहिती घेण्याच्या वेळी घडली. तक्रारदार अजित पिलणकर हे तिकीट बुकिंगबाबत काही माहिती शोधत होते. याच दरम्यान, त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्हॉट्सॲप नंबरने अचानक एक लिंक पाठवली. ही लिंक तिकीट बुकिंगशी संबंधित असावी, या समजुतीने तक्रारदार यांनी ती लिंक उघडली आणि त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती भरण्यास सुरुवात केली.
माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, काही वेळात तक्रारदार यांच्या बँक खात्यातून ९३ हजार रुपये कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, अजित पिलणकर यांनी तात्काळ हे प्रकरण गंभीरतेने घेत रत्नागिरी शहर पोलिसात धाव घेतली आणि अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली.




