
कोकणासह घाटमाथ्यावर आज पावसाचा अंदाज
मॉन्सून राज्यातून तडीपार झाला असला तरी काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आज कोकणात सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा तर उर्वरित राज्यात उन्हाची झळ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात थोड्या अधिक प्रमाणावर ढगाळ हवामान, उन्हाची झळ आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३२ अंशांपार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ, जळगाव, रत्नागिरी, अमरावती येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.




