मुंबईतील एका वृध्द व्यावसायिकालाडिजिटल अरेस्ट’ची भीती घालून ५८ कोटी रुपये उकळल्याचा प्रकार,देशातील आजवरची सर्वात मोठी फसवणूक!


मुंबई : आभासी कैद अर्थात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहे. मुंबईतील एका वृध्द व्यावसायिकाला अशाच आभासी कैदेची भीती घालून ५८ कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आजवरची ही देशातील सर्वात मोठी फसवणूक आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींची अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनी लॉंड्रींगच्या गुन्ह्याची भीती

तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे ७२ वर्षीय व्यावसायिक आहेत. १९ ऑगस्ट रोजी सायबर भामट्यांनी तक्रारदाराला सक्तवसुली संचलनालाय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवले. मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती घालण्यात आली. त्यानंतर आभासी कैद (डिजिटल अरेस्ट) केल्याचे सांगून आपल्या जाळ्यात ओढले होते. १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर २०२५ या काळाता तब्बल ५८ कोटी १३ लाख रुपये उकळले. एकूण १८ खात्यात हे पैसे वळविण्यात आले होते.

डिजिटल अरेस्ट मधील सर्वात मोठी फसवणूक

आभासी कैदेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असते. मात्र या गुन्ह्यात ५८ कोटींची झालेली ही देशातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईत २० कोटी आणि त्यानंतर दिल्लीत २३ कोटी रूपये उकळण्यात आले होते.

तिघांना अटक

सायबर पोलिसांनी अब्दुल नासिर खुल्ली (४७), चिरा बाजार येथील स्टील व्यापारी अर्जुन कडवासरा (५५) आणि त्याचा मुंबई सेंट्रल येथील भाऊ जेठाराम कडवासरा (३५), या तिघांना अटक केली आहे. तिघांच्या खात्यावर या गुन्ह्यातील २५ लाख वळविण्यात आले होते. ज्या बँक खात्यामध्ये पैसे वळते करण्यात आले त्यापैकी काही बँक खाती गोठवली आहेत. यामध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.

काय आहे डिजिटल अरेस्ट?

डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणुकीचा एक प्रकार आहे. या मध्ये सायबर भामटे व्हिडियो कॉल करतात. स्वत:ला सीबीआय, ईडी, पोलीस असल्याचे भासवतात. समोर नकली पोलीस ठाणी दाखवतात. कुठल्यातरी घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे भासवतात आणि आभासी कैद अर्थात डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगतात. तुमच्या खात्यांवर, व्यहारांवर नजर असून चौकशी असल्याचे सांगतात. परंतु प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. जे लोकं या भूलथापांना घाबरतात त्यांच्याकडून तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळले जातात. मुंबईत मागील वर्षात डिजिटल अरेस्टचे १०२ गुन्हे नोंदविण्यात आले होेते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button