
दीपोत्सवात विद्युत सुरक्षेला द्या प्राधान्य, महावितरणचे आवाहन
रत्नागिरी/सिंधुदुर्ग, – आनंदाचा व उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र हे करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. विद्युत सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासूनदेखील सावध राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सुलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये. आकाश कंदिल किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी थ्री पिनचा वापर न करता, वायर्स थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या साह्याने खोचले जातात. त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंध असावी. वायर तुटलेली किंवा सेलो टेपने जोडलेली नाही याची खात्री करून घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. www.konkantoday.com




