
“चेक क्लिअरिंग प्रणाली” अडकली गोंधळात
राजापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ४ ऑक्टोबरपासून लागू केलेली “सतत चेक क्लिअरिंग प्रणाली” (Continuous Cheque Clearing System) सुरळीत होण्याऐवजी गोंधळात अडकली आहे. अनेक बँकांमध्ये सिस्टीम अपडेट न झाल्याने तसेच कर्मचारीवर्गाला प्रशिक्षण न मिळाल्याने ग्राहकांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी दिवसन्दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
नवीन प्रणालीमुळे चेक काही तासांत क्लिअर होऊन रक्कम खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र वास्तवात, चेक जारी करणाऱ्या (ड्रॉइंग) बँकेच्या खात्यातून पैसे वजा झाले असूनही, चेक जमा केलेल्या बँकेत ती रक्कम जमा होत नाही. काही ठिकाणी तीन ते पाच दिवसांचा, तर काही ठिकाणी दहा ते पंधरा दिवसांचा विलंब होत असल्याचे ग्राहक सांगत आहे.
राजापूर तालुक्यातील नाटे परिसरातील एका बँकेत घडलेली घटना या समस्येचे गांभीर्य स्पष्ट करते. येथे एका महिलेने आपला कर्जाच्या हप्त्यासाठी मिळालेला चेक बँकेत जमा केला होता; मात्र जवळपास १२ दिवस उलटूनही तिच्या खात्यात रक्कम जमा झालेली नव्हती.
दरम्यान, समोरच्या बँकेच्या खात्यातून ती रक्कम आधीच डेबिट झाल्याची नोंद होती.
“ही रक्कम कर्जाच्या स्वरूपात मिळाली होती. आता पैसे खात्यात येत नाहीत, पण व्याज भरावे लागणार आहे. ज्या कामासाठी पैसे काढले ते थांबले आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झालाय,” असे सांगताना ती महिला अक्षरशः रडकुंडीला आली, अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. ही घटना नव्या चेक क्लिअरिंग व्यवस्थेतील त्रुटींचे ठळक उदाहरण ठरली आहे.
या अडचणींमुळे अनेक शाखा व्यवस्थापकांना ग्राहकांच्या तक्रारीनंतर थेट क्लिअरिंग विभागाशी मेलद्वारे संपर्क साधावा लागत आहे. काही शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ग्राहकांना रक्कम अडकली आहे हे दिसते, पण ती नेमकी कुठे अडकली हे सिस्टीममध्ये दिसत नाही. क्लिअरिंग विभागाकडून प्रतिसाद यायला वेळ लागतो.”
बँकेतील अधिकारीसुद्धा या नव्या प्रणालीच्या तांत्रिक तपशीलांबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या शंकांना ठोस उत्तरे न मिळाल्याने असंतोष वाढला आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांनी तणाव व्यक्त करत बँकेतच उद्रेक केल्याच्या घटना नोंदल्या जात आहेत.
“आरबीआयच्या चांगल्या उद्देशाने सुरू केलेली प्रणाली प्रत्यक्षात ग्राहकांसाठी मनस्तापाचे कारण ठरतेय. प्रणाली स्थिर होईपर्यंत अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे द्यावीत,” अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
तज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत ग्राहकांनी आपल्या व्यवहारांचा संपूर्ण तपशील लेखी स्वरूपात ठेवावा आणि चेक क्रमांक, तारीख, रक्कम, डेबिट पुष्टी यासह बँकेकडे लेखी तक्रार द्यावी.




