
राजापूर येथे ७ दिवसीय क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण संपन्न
राजापूर : महाराष्ट्र शासन गृह विभाग (विशेष) अंतर्गत कार्यरत रत्नागिरी नागरी संरक्षण दलामार्फत आयोजित ७ दिवसीय क्षमता बांधणी व विकास प्रशिक्षण पाठ्यक्रम नाटे हायस्कूल (ता. राजापूर) येथे यशस्वीपणे संपन्न झाला.
या प्रशिक्षणाचा उद्देश आपत्ती व्यवस्थापन, नागरिकांमध्ये सजगता निर्माण करणे, बचावकार्य कौशल्य विकसित करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर नागरी संरक्षण पथक तयार करणे हा होता.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा उपनियंत्रक अधिकारी ले. कर्नल प्रशांत चतुर (नि.) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे सर्व सत्रे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि समन्वयाची जबाबदारी सहाय्यक उपनियंत्रक आननसिंग गढरी आणि मास्टर ट्रेनर अक्षय जाधव यांनी प्रभावीपणे पार पाडली.
या सात दिवसीय प्रशिक्षणामध्ये ३० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, प्राथमिक उपचार, पूरस्थितीतील बचावकार्य, भूकंप व आगप्रसंगी नागरिकांचे संरक्षण, तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य संप्रेषण या विषयांवर सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन देण्यात आले.
बचाव साधनांचा वापर, धूर व आग नियंत्रण, स्ट्रेचरद्वारे जखमी व्यक्तींचे स्थलांतर यासारखी थेट प्रात्यक्षिके दाखविण्यात आली, ज्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीचा अनुभव मिळाला.
या प्रशिक्षणाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बांदकर, तसेच नाटे विद्या मंदिर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. स्थानिक प्रशासन, महाविद्यालयीन कर्मचारी व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला.
समारोपप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विश्वास करगुटकर, श्री. मांजरेकर, तसेच नाटे ग्रामपंचायतीचे सदस्य व इतर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करताना अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक जबाबदारी, धैर्य आणि सज्जता विकसित होते, असे मत व्यक्त केले.
या शिबिराच्या माध्यमातून नाटे परिसरात नागरी संरक्षण दलाबद्दल जनजागृती वाढली असून, आपत्तीप्रसंगी नागरिकांची सुरक्षा व तत्पर प्रतिसाद देण्याची क्षमता वृद्धिंगत झाली आहे.




