
धनंजय देसाई यांच्या घरावर दरोडा टाकून, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी
हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
गुहागर : हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख संजय जयराम देसाई यांचे पुण्यातील निवासस्थान पडणाऱ्या क्रूर मनोवृत्तीच्या विलास परमार, महेश खाडे आणि ३६ ते ४० गुंडांवर दरोडा, घरफोडी, मारहाण अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व तिथे उपस्थित पोलीस अधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मिनेश कदम, गौरव पावसकर, सुजित नाईक, अभिमाने, सुशील कदम, श्री. जोशी, स्वयंम नायर, शैलेश बेर्डे यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख संजय जयराम देसाई यांच्या पुण्यातील निवास स्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व ३५ ते ४० गुंडांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसतानाही ४ जेसीबी व २ पोकलेंडने घर पाडण्यास सुरुवात केली.
यावेळी घरामध्ये ९० वर्षांची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते. आलेल्या गुंडांनी घरातील महिलांना व १४ वर्षांच्या मुलीला शस्त्रांचा धाक दाखवून छातीला, हाताला व कपड्यांना धरून बाहेर ओढत आणले तिचा विनयभंग केला आणि वृद्ध व्यक्तीस घरातच ठेवून घर पाडण्यास सुरुवात केली.
या प्रकारचा त्रास घरातील लोकांना देत असताना अडविण्यासाठी गेले असता महेश खाडे या व्यक्तीने “आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचं” असे म्हटले तेव्हा घरातील लोकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क केल्यामुळे पोलीस संबंधित ठिकाणी आले; परंतु तिथे त्यांनी पूर्णपणे एकतर्फी व बघ्याची भूमिका घेतली. आत ९० वर्षीय वृद्ध आहे, हा प्रकार थांबवा असे सांगून देखील पोलिसांनी ते न थांबवता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा असा सल्ला दिला. तसेच घरातील काही मुले घर पडणाऱ्यांना विरोध करत आहेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकून पोलिसांनी त्यांना गाडीत बसून ठेवले.
मुळात कोणताही प्रशासकीय आदेश नसताना घरावर अशा प्रकारचा दरोडा टाकण्याचा प्रकार चालू असताना पोलीस प्रशासनाने ते थांबविले का नाही? पोलीस प्रशासनाच्या या एकतर्फी भूमिकेमुळे त्या घरातील लोकांना भीषण त्रास सहन करावा लागला. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन क्रूर मनोवृत्तीच्या विलास परमार, महेश खाडे सोबत ३६ ते ४० गुंडांवर दरोडा, घरफोडी, मारहाण अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व तिथे उपस्थित पोलीस अधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मिनेश कदम, गौरव पावसकर, सुजित नाईक, अभिमाने, सुशील कदम, श्री. जोशी, स्वयंम नायर, शैलेश बेर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.




