
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जमीरभाई खलफे ‘भाकर मित्र पुरस्काराने’ सन्मानित
रत्नागिरी: (विशेष प्रतिनिधी) पत्रकारिता आणि समाजकारणाच्या दुहेरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे रत्नागिरीचे उपक्रमशील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जमीरभाई खलफे यांना नुकताच प्रतिष्ठेचा ‘भाकर मित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते त्यांना हा सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या भरीव कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याने रत्नागिरीच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सन २०१७ पासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले जमीरभाई खलफे हे ‘दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रात कार्यरत आहेत. आपल्या प्रभावी लेखणीतून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाचे आणि दुर्लक्षित विषय समाजासमोर आणले आहेत.
विशेषतः, सर्वसामान्य नागरिक, अडचणीत सापडलेले लोक आणि ग्रामीण भागातील प्रश्न शासनापर्यंत पोटतिडकीने पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असून, ते ‘संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी’ चे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून ते सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देत असतात. तसेच, मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी चे तालुका सचिव आणि प्रसिध्दी प्रमुख यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही ते समर्थपणे सांभाळत असून पत्रकारांच्या समस्यांवर आवाज उठविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
याशिवाय, ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळावी यासाठी ते प्रयत्नशील असतात.
‘सैतवडे सोशल वेल्फेअर सोसायटी’ चे सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी ग्रामीण युवकांसाठी विविध विषयांवर प्रबोधन व मार्गदर्शन वर्ग आयोजित केले, ज्यामुळे अनेक तरुणांना योग्य दिशा मिळाली आहे. पत्रकारिता आणि समाजकारण अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या जमीरभाई खलफे यांचा ‘भाकर मित्र पुरस्काराने’ झालेला सन्मान हा त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे.
दिनांक १३/१०/२०२५ रोजी भाकर सेवा संस्थेचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला, याच कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माहिती व संपर्क अधिकारी श्री. प्रशांत सातपुते, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग श्री. दीपक घाटे, डॉ. रत्ना जोशी, सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते, महात्मा फुले समाजसेवा मंडळ चे अध्यक्ष श्री. प्रमोद झिंझाडे हे मान्यवर उपस्थित होते. भाकर सेवा संस्था दरवर्षी सामाजिक काम करणाऱ्या १०० लोकांचा या पुरस्काराने सन्मान करते.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना श्री. प्रशांत सातपुते यांनी संस्थेच्या कार्याला मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. रत्ना जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील एक शोकांतिका मांडली.
त्या म्हणाल्या की, उच्च शिक्षित व्यक्ती आपल्या पालकांना वृद्धाश्रमात पाठवतात, मात्र शेतकरी मुलगा त्यांच्या पालकांना कधीच वृद्धाश्रमात पाठवत नाही.
तर श्री. युयुत्सु आर्ते यांनी संस्थेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी भाकर सेवा संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पाटील, अध्यक्ष श्रीमती मंगल पोवार, सचिव श्रीमती अश्विनी मोरे, खजिनदार श्रीमती प्रतिक्षा सोलीम, संचालक श्री. पवनकुमार मोरे, संचालक श्रीमती कमलताई लोकुरे आणि संस्थेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. जमीरभाई खलफे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे भावी पिढीला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.




