
लांबलेल्या पावसामुळे रत्नागिरी हापूसचा हंगाम उशीरा सुरू होण्याची शक्यता
दापोली तालुक्यात चालू मान्सून हंगामात आतापर्यंत तब्बल ४४६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत पडणारा पाऊस भात पीक शेतकर्यांसाठी एकीकडे चिंता निर्माण करणारा असून हापूस आंबा बागायतदारांसाठी देखील धोक्याचा इशारा देणारा ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, लांबलेला पाऊस हापूस आंब्याच्या वाढीला पोषक ठरणार असला, तरी हंगाम थोडा उशिराचा होण्याची शक्यता आहे. यामुळे हापूस आंब्याला अपेक्षेप्रमाणे दर मिळणार नाही व हापूस आंबा बागायतदारांचे अर्थकारण बिघडणार आहे.
सुरुवातीच्या काळातील मुबलक पाऊस झाडांच्या वाढीसाठी आणि मातीतील आर्द्रतेसाठी उपयुक्त असतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक ’फूड सपोर्ट’ मिळतो. मात्र ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालू राहिला, तर झाडांना आवश्यक तो ’ताण’ मिळत नाही आणि फुलोरा उशिराने येऊन हंगाम पुढे ढकलला जातो. त्यामुळे बाजारात हापूस येण्याचा कालावधी लांबण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून दिसून आले आहे की ऑक्टोबरमधील कमी पाऊस आणि योग्य ताण यामुळे फुलधारणेत वाढ होते
व उत्पादनही उत्तम मिळते. मात्र यावर्षी अशी परिस्थिती नाही ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सुरू राहिला तर हंगाम मार्चऐवजी एप्रिलपर्यंत ढकलला जाऊ शकतो, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
या लांबलेल्या पावसाचा नकारात्मक परिणाम रब्बी व खरीप पिकांवर होत आहे. भात, नाचणी, नागली यांसारख्या पिकांना सततच्या पावसामुळे विश्रांती मिळत नाही.
मुळे कुजणे, खतांचा योग्य परिणाम न होणे आणि ओलाव्यामुळे रोगराई वाढणे यामुळे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.www.konkantoday.com




