
चिपळूणमध्ये ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचा जल्लोष
वेदिका बुरटे ठरल्या विजेत्या; प्लास्टिकमुक्त मोहिमेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
चिपळूण : चिपळूण नगर पालिकेच्या वतीने, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था व नाटक कंपनी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक मुक्ती अभियानात महिलांचा पुढाकार वाढावा या उद्देशाने आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा समारोप जल्लोषात पार पडला.
प्लास्टिक मुक्ती मोहिमेत सहभागी झालेल्या महिलांमधून लकी ड्रॉद्वारे वेदिका विक्रम बुरटे या ‘चिपळूणच्या होम मिनिस्टर’ ठरल्या, तर वसुधा शेटे या ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत विजेत्या ठरल्या. सर्वाधिक प्लास्टिक संकलन करणाऱ्या उमा दीपक आलेकर आणि मोहिमेत इतर महिलांना सहभागी करून घेणाऱ्या स्वप्नाली निवाते यांनाही पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पारितोषिक वितरण समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नृत्य मल्हार कथक अकॅडमीच्या कोमल राणे यांनी सुंदर गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक उमेश सकपाळ, रसिका देवळेकर, सीमा चाळके, रांगोळीकार संतोष केतकर, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, नाटक कंपनीचे अध्यक्ष मानस संसारे, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव आणि उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना भाऊ काटदरे यांनी मोहिमेचा उद्देश मोहीम कशा पद्धतीने राबवली जाते, याविषयीची सविस्तर माहिती दिली. या मोहिमेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे व चिपळूण शहराला प्लास्टिक मुक्त करावी, असे आव्हान त्यांनी केले.
माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी चिपळूण शहरांमध्ये पावसाळ्यात पाणी भरले, तर प्लास्टिकच्या बॉटल्स व अन्य काही वर येत नाहीत, असे सांगून चिपळूण नगर पालिका व सह्याद्री निसर्ग मित्रचे प्लास्टिक मुक्तीसाठीचे काम उत्तम सुरू असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या महिला आघाडीच्यावतीने ही मोहीम अधिक पुढे जाण्यासाठी आपण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिले.
‘होम मिनिस्टर’ व ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धांचे रंगतदार सूत्रसंचालन शाहीर खेरटकर यांनी केले. या अटीतटीच्या स्पर्धांमध्ये वेदिका बुरटे यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या महिलांना जयंत साडी सेंटर, चिपळूण यांच्यावतीने प्रायोजित पैठणी देऊन गौरविण्यात आले.
समारोपप्रसंगी मुख्याधिकारी विशाल भोसले, उपनगराध्यक्ष बापू काणे, भाऊ काटदरे, मानस संसारे, दीपा देवळेकर, सुनील खेडेकर, मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, सुजित जाधव, बापू साडविलकर आणि रोहित खाडे यांच्या उपस्थितीत महिलांना सन्मानित करण्यात आले.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ६० वर्षांहून अधिक वयाच्या महिलांनीही उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या उत्साहाचे कौतुक करत त्यांना ‘वैभवशाली चिपळूण’ व ‘रत्नाक्षरे’ ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी केले. या उपक्रमाच्या यशासाठी चिपळूण नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.




