
चिपळुणात जागोजागी अतिक्रमण, प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
चिपळूण शहरातील कानाकोपर्यात वाढलेले अतिक्रमण पाहता सध्या त्याचाच बाजार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती उदभवली असून पूर्वीच्या अतिक्रमणातही कमालीची वाढ झाली आहे. कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल परिसरात स्टॉलची गर्दी झाली आहे. पानगल्ली हाऊसफुल्ल झाली असून शिवनदी परिसरातील महिला शौचालय स्टॉल व अन्य अतिक्रमणाने झाकले आहे. त्यामुळे या अनधिकृत स्टॉलवर नगर परिषद पोलीस बंदोबस्तात कारवाई करणार आहे.
अतिक्रमण हा शहराला लागलेला कलंक आहे. काही मोजक्याच व्यावसायिकांच्या फायद्यासाठी हजारो नागरिकांसह वाहन चालकांना दररोज वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे होणार्या तक्रारींमुळे नगर परिषद सातत्याने या अतिक्रमणावर कारवाई करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सर्वात मोठी धडक कारवाई करून मोकळे केले होते. मात्र त्यानंतर ही कारवाई किरकोळ स्वरूपाची झाली.
काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी व्यावसायिकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यातूनच भर रस्त्यात स्टॉल उभारणार्यांची संख्या वाढली आहे. यातील बहुतांशी स्टॉल अनधिकृत असून नगर परिषद घेत असलेल्या हरकतींकडेही व्यावसायिक दुर्लक्ष करीत आहेत. यातूनच कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल परिसरात स्टॉलची गर्दी झाली आहे. १६ बचत गटांनी स्टॉलसाठी नगर परिषदेकडे अर्ज केले आहेत. तर अनेकांनी कोणतीही परवानगी न घेताच स्टॉल उभारले आहेत. याच परिसरातील शिवनदीलगत असणारे महिला शौचालय स्टॉल व अन्य अतिक्रमणामुळे झाकले आहे. विशेष म्हणजे या शौचालयांच्या दारातच पुरूष विक्रेते व्यवसाय करीत असल्याने महिलांची गैरसोय होत आहे.www.konkantoday.com




