
“खरं सांगायचं तर ….”खरच सांगायच तर इंडियन मेडीकल असोसिएशन, रत्नागिरीच्या डॉक्टर कलाकारांनी सादर केलेला एक सुंदर नाट्यप्रयोग…
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे…9422052330
काल रविवारी इंडियन मेडीकल असोसिएशन, रत्नागिरीचे सदस्य डॉक्टर यांनी सादर केलेल्या “खर सांगायच तर” या रहस्यमय नाटकाला जाण्याचा योग आमचे शेजारी डॉक्टर अतुल देशपांडे यांच्या सविनय निमंत्रणामुळे आला. तशी डॉक्टर मंडळींनी या असोशिएशन मार्फत सादर केलेली सुरुवातीची नाटके पहाण्याचा योग आला होता तो कलाकार, दिग्दर्शक..नेपथ्य वगैरे वगैर सबकुछ ऑल इन कलाकार आमचे मित्र डॉक्टर कै. जयंत अभ्यंकर आणि तत्कालीन सदस्य डॉक्टर कै.दिलीप श्रीखंडे यांच्यामुळेच. त्यानंतर नाट्यप्रयोग हे असोशिएशनचे निमंत्रितांसाठीच असल्याने ते पहाण्याचा योग आला नव्हता पण डॉक्टर देशपांडे यांनी निमंत्रण दिले तेही योगायोगाने जयंतच्या दवाखान्यासमोरच त्यामुळे आठवण प्रकर्षाने झाली.
मी काही नाटकाचा परिक्षक नाही किवा समीक्षक नाही, पण सर्वसाधारण जनतेला जे भावते ते मलाही आवडते त्यामुळे एक चांगला प्रेक्षक म्हणून मी डॉक्टर मंडळींच्या या नाट्यप्रयोगावर फिदा झालो असे माझे मलाच वाटले. “दिग्दर्शक आमचे आम्हीच” या एका वेगळ्याच टॅग लाईनचे नाटक त्यांनी यशस्वीरित्या सादर केले या बद्दल सर्व कलाकार आणि सहाय्यकांचे खूप खूप अभिनंदन. नाटक पहातांना डॉक्टर मंडळींनी चांगलीच मेहनत घेतली असल्याचे जाणवत होते. काही जुने तर काही नवीन कलाकारांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायामधून वेळ काढून ज्यांनी कोणी या नाटकासाठी त्यांची यशस्वी मोट बांधली त्या पडद्यामागील डॉक्टरांचे खरोखरच मन:पूर्व अभिनंदन. नाटकातील पात्रांची निवड हा तर नाटकाच्या यशाचा पहिला गाभा असतो आणि तो या मंडळींनी अचूक हेरला असेच म्हणावे लागेल.
एक वकीलाच्या ऑफिसचा सेट आणि दुसरा कोर्ट सीनसाठी कोर्टाचा सेट एवढ्याच सुंदर नेपथ्याच्या सेटवर संपूर्ण नाटक उभे असले तरी नाटकाचा प्रेक्षकांना अपवाद सोडला तर कंटाळा आला नाही हे विशेष. पहिल्या अंकानंतर रहस्यभेद होणार यामुळे बहुतांशी प्रेक्षक नाट्यगृहात खिळून बसले होते हे जाणवत होते. नाटकातील रहस्यमय पार्श्वभूमीवर नाटकाचे पार्श्वसंगीत तर केवळ अप्रतिम…त्या संयोजकाला सलाम. नाटकाची तांत्रिक बाजू नक्कीच व्यावसायिक नाटकाच्या तोडीची होती असे विधान करणे धाडसाचे होणार नाही याची खात्री आहे.
आता कलाकारांविषयी थोडेसे तरी लिहिणे आवश्यक आहे असे मला वाटते. सर्वच कलाकारांनी नेमून दिलेली कामे अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली हे कौतुकास्पद आहे. हौशी कलाकार म्हणून प्रेक्षक समजून घेतील अशा गैरसमजुतीमध्ये न रहाता कलाकारांनी उत्तम पाठांतरासकट सर्वच बाजूवर व्यावसायिकतेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचण्याचा पल्ला उत्तमप्रकारे गाठला. डॉक्टर अतुल देशपांडे, सौ. देशपांडे, डॉक्टर गोंधळेकर-सौ. गोंधळेकर हे तसे जुने मुरब्बी कलाकार ज्यांनी जयंत अभ्यंकरांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यप्रयोग सादर केलेले आहेत असे. जयंताकडून जे जे घेता येईल ते ते सर्व या मुरब्बी कलाकारांनी उत्तम प्रकारे आत्मसात केले आहे असे मला चांगलेच जाणवले. नुसतीच व्यक्तिगत कला सादर केली असे नव्हे तर आपल्या बरोबर काम करणा-या कलाकारांना आपल्या अनुभवाचा फायदा करून देतांना त्यांनी कोणतीही कसूर केली नव्हती हेही मला विशेष वाटले. देशपांडे यांनी त्यांच्या स्वत:च्याच सरळ सौम्य आणि मितभाषी-मृदुभाषी व्यक्तिमत्वाचा आपल्या रहस्यमय भूमिकेसाठी पुरेपूर उपयोग करून घेतल्याचे चांगलेच जाणवले तर सौ. देशपांडे यांनी वेगळ्या भाषेचा अभ्यासपूर्ण उपयोग करून त्यांची भूमिका उत्तमप्रकारे साकार केली. आयेशा या पात्राच्या विविध ढंगी भूमिकेत सौ. गोधळेकर यांनी कमालीची परिपक्वता दाखविली तर डॉक्टर गोंधळेकरांनी तर एक आगळ्यावेगळ्या अल्पशा पण नाटकाला अचानक ट्विस्ट देणा-या भूमिकेमध्ये धमालही आणली त्याची दाद त्यांना प्रेक्षकांनीच दिली होती. तरूण तुर्क कलाकार डॉक्टर अनिरुध्द फडके यांची सरकारी वकीलाची भूमिका आवाजाच्या चढ उतारांनी चांगलीच दाद घेऊन गेली तर अजून एक नवोदित कलाकार डॉक्टर सुहृद प्रभुदेसाई यांनी ज्युनिअर वकीलांची भूमिका व्यवस्थितपणे सादर केली. पोलिस इन्स्पेक्टर या अगदी छोट्याश्या भूमिकेत डॉक्टर मतीन परकार तर (बहुधा)दुहेरी भूमिकेमध्ये शुभांगी बेडेकर यांनी रंगमचावर येण्याचे धाडस यशस्वी करून दाखविले ते प्रेक्षकांकडून टाळ्या आणि हास्यविनोदाची दाद घेऊन. मला सर्वात योग्य आणि अचूक पात्र निवड वाटली ती म्हणजे डॉक्टर अश्विन वैद्य यांची. एकादा मध्यमवयीन उमदा पण मॅच्युअर सिनिअर कौन्सिल-वकील म्हणून त्यांनीही रंगमंच सुशोभित केला आणि दिलेल्या भूमिकेला न्याय दिला एवढेच वर्णन पुरेसे होईल असे मला वाटते. डॉक्टर नितिन चव्हाण यांचेबद्दल वेगळे लिहिण्याची गरज नाही इतके त्यांचे अभिनयामधील गुण सर्वांनाच परिचित आहेत. अर्थात यावेळी न्यायाधीशाच्या अल्प संवादाच्या भूमिकेला त्यांनी खणखणीत आवाजामध्ये न्याय देण्याचे काम केले.
विशेष नमूद करण्यासारखे म्हणजे सर्वच कलाकारांचे आवाज खणखणीत होते आणि त्यांनी ते पूर्ण ताकदीने वापरले. अलिकडे माईक सिस्टीम जरी पॉवरफुल झाली असली तरी त्याला पुरेसे आवाज देणेही तितकेच गरजेचे असते हे लक्षात घेऊनच सर्व कलाकार स्टेजवर वावरत होते. टेकनॉलॉजी प्रचंड प्रमाणात विकसित झाली असली तरी तिचा वापर योग्य प्रकारे करून घेणे आणि तो प्रेक्षक वर्गासमोर पोहोचविणे हे कसबही पडद्यामागील कलाकारांनी यशस्वीपणे दाखविले आणि नाटक सर्वार्थाने उत्तमप्रकारे सादर झाले…त्याबद्दल प्रेक्षकांनी कौतुकाची थापही दिली हे कलाकारांना प्रोत्साहन देणारेच असते. कोणाचा उल्लेख नजरचुकीने राहीला असेल तर क्षमा मागून त्यांचेही कौतुकही करतो.
वकीलीचा व्यवसाय असला तरी अशा नाटकांमधून संहितेचा साचा ठरलेला असल्याने प्रत्यक्षातील कोर्ट सीन कडे दुर्लक्ष करून एक ड्रामा सीन म्हणून पहायचे असे मनामध्ये ठरलेले असल्याने मला या कोर्ट रुम ड्रामाचा जास्त आनंद घेता आला असावा.
मला इंडियन मेडिकल असोशिएशन, रत्नागिरी शाखेचे विशेष अभिनंदन या निमित्ताने करावयाचे आहे ते अशासाठी की काही वर्षापूर्वी डॉक्टर कै. जयंत अभ्यंकर यांची नाट्यकलेची परंपरा आजही तशीच यशस्वीपणे चालू ठेवली आहे याचा मला व्यक्तिगत खूप आनंद आहे. डॉक्टर अतुल देशपांडे, सौ. देशपांडे, डॉक्टर गोंधळेकर-सौ. गोंधळेकर यांच्यासारख्या मुरब्बी कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा अशीच चालू राहील आणि असोसिएशनचे सर्व सदस्य आपापल्या वैद्यकीय व्यवसायामधूनही वेळ काढून स्वत:ला आणि काही प्रमाणात सर्वसामान्य जनतेला नाट्यकलेच्या माध्यमातून आनंद देईल असा विश्वास वाटतो.




