
कोकणातील शेतीचे वन्यप्राण्यांमुळे सर्वाधिक नुकसान, अहवालात माहिती उघड
वन्य प्राण्यांमुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांचे दरवर्षी तब्बल दहा ते चाळीस हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था पुणे यांच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभागाने केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. मानव वन्यजीव संघर्ष शेतीच्या नुकसानीचा सांख्यिकीय आढावा (महाराष्ट्र) हा राज्यव्यापी अभ्यासाचा अहवाल कुलपती संजीव सानियाल यांच्या हस्ते नुकताच प्रकाशित झाला. यात ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे.
या अहवालातील अभ्यासात कोकण, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भ या विभागांचा समावेश करण्या आला असून हे भारतातील पहिल्यांदाच राज्यव्यापी पातळीवर केलेले संशोधन ठरले आहे. शेतकर्यांच्या मते, वन्य प्राण्यांमुळे प्रती हेक्टरी सरासरी २७ हजार रुपयांचे नुकसान होते. रानडुक्कर, निलगाय, माकडे, गवा, सांबर यासारख्या शाकाहारी प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात असून ते जंगलालगतच्या गावांपुरते मर्यादित नाही.
अभ्यासानुसार कोकण विभागात सर्वाधिक नुकसान होत आहे. रानडुक्कर आणि माकडांच्या उपद्रवामुळे अनेक कुटुंबानी पारसबाग आणि भाजीपाला शेती पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे आता शेतकर्यांना देखील दर आठवड्याला बाजारातून भाजी विकत आणण्याची वेळ आली आहे. मराठवाडा आणि खानदेशासारख्या मर्यादित जंगल असलेल्या भागातही काही पिके पूर्णपणे सोडल्याचे शेकर्यांची नमूद केले आहे. नमुना शेतकर्यांपैकी ५४ टक्के शेतकर्यांनी किमान एक पीक पूर्णपणे सोडले तर ६२ टक्के शेतकर्यांनी शेतीचे क्षेत्र कमी केले.
शेतकर्यांचे वाढते नुकसान केवळ शेतीपुरते मर्यादित नसून सामाजिक आणि आर्थिक पातळीवरही परिणाम घडवत आहे. शेती असुरक्षित वाटल्यामुळे तरूण पिढी शेतीकडून दूर जात आहे. स्थलांतर वाढत असून ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे.www.konkantoday.com




