
कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात’वाचन प्रेरणा दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिवस’ विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘दिवाळी अंक २०२५’चे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी विविध विषयांना वाहिलेल्या दिवाळी अंक प्रदर्शित करण्यात आले होते. याप्रसंगी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कला शाखेच्या उपप्राचार्या आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे, डॉ. आनंद आंबेकर, डॉ. शिवराज गोपाळे, प्रा. महेश नाईक, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. प्रभात कोकजे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानंतर ‘घेऊया एकच वसा मराठीला बनवू या ज्ञानभाषा’ या संकल्पनेला समोर ठेऊन मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतरत्न डॉ. कलाम यांची आणि त्यांच्यावर आधारित असलेली पुस्तके आणि विज्ञानविषयक पुस्तकांचे ‘ग्रंथ प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते. प्रामुख्याने डॉ. कलाम यांचे विज्ञान विषयक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदर ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
मुख्य कार्यक्रमामध्ये स्वागत आणि प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी ग्रंथालयाचे वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाचनाला प्रवृत्त करणारी विविध विषयांना वाहिलेली आणि विविध विशेष दिवसांचे औचित्य साधून आयोजित केली जाणारी ग्रंथ प्रदर्शने विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारी ठरतात असा आशावाद व्यक्त केला. आजच्या ‘वाचन प्रेरणा दिवसाचे’ औचित्य साधून आयोजित केलेल्या विविधरंगी कार्यक्रमांचाही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनात उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘डॉ. अब्दुल कलाम यांचे वाचनविषयक विचार आपण आत्मसात करून खऱ्या अर्थाने वाचन प्रेरणा घेतली पाहिजे!’ पुढे त्यांनी वाचन ही सतत चालणारी प्रक्रिया असून आपण विविध प्रकारची आणि विविध विषयांना वाहिलेली पुस्तके सातत्याने वाचली पाहिजेत; असे आवाहन केले. महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये भेट म्हणून ‘पुस्तक’ देण्याचा उपक्रम सरू केल्याचे सांगितले; जेणेकरून वाचनाला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळेल असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
दुपारी १२.३० वाजता झालेल्या कार्यक्रमात ‘ग्रंथ अभिवाचन- एक कला’ या विषयावरील प्रा. वैभव कानिटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी ग्रंथांचे मानवी जीवनातील महत्व, वाचनाचे महत्व काय आहे याचे विवेचन विद्यार्थ्यांसमोर केले. वाचनाची सवय लागल्यावर ग्रंथ अभिवाचन तुम्हाला अधिक प्रोत्साहित करते असा विचार त्यांनी मांडला. काळ कितीही बदलला तरी चांगले वाचन आपल्याला स्वत:चे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी खूपच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. वाचनातील आवड आणि सातत्य आपल्यामध्ये अमुलाग्र बदल घडवते असे सांगून त्यांनी ग्रंथ अभिवाचन ही एक महत्वाची कला असल्याचे नमूद केले. वाचन वेग, आवाजातील चढ उतार, शब्द फेक, श्वासावरील नियंत्रण या घटकांना अनुसरून आपण लेखकाच्या भावना समजून घेऊन त्याचे साहित्यातील विचार अभिवाचनाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत; असे विचार मांडले. विद्यार्थी श्रोते मंत्रमुग्ध होऊन व्याख्यान ऐकत असल्याचा अनुभव आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथ अभिवाचन सादर केले. या महाविद्यालयाच्या ‘वाचक गटातील’ विद्यार्थिनी यामध्ये कु. जान्हवी जोशी, कु. वृषाली कोवळे, कु. सेजल मेस्त्री तसेच ‘वाड्मय मंडळातील’ विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने उपस्थितांसमोर आपली ग्रंथ अभिवाचन कला सादर केली. त्यानंतर श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी आयोजित ग्रंथ अभिवाचन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी कु. वीणा योगेश काळे, कु. वैदेही विवेक वैद्य, कु. अर्पिता आनंद बापट, कु. स्वरदा महेश केळकर, कु. श्रिया अभिजित केळकर, कु. श्रावणी योगेश खांडेकर तसेच ओंकार आठवले याने आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचक गटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने तर आभारप्रदर्शन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक, वाचक गट, वाड्मय मंडळ आणि इतर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.




