लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वाड्मय पुरस्कार प्रदान

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिले जाणारे वाड्मय पुरस्कार नुकतेच वाचनालयाच्या ‘बाळशास्त्री जांभेकर’ सभागृहात प्रसिद्ध गझलकार प्रा. कैलास गांधी यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कार विजेते श्रीकांत पाटील, अविनाश बापट, प्रा. सुहास बारटक्के, विजय जोशी, धनाजी घोरपडे आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कवीवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर कार्याध्यक्ष इंगवले यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी, ज्या मान्यवर साहित्यिकांच्या स्मृती प्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात त्या कवी आनंद तथा वि. ल. बर्वे तसेच कवी माधव तथा माधव केशव काटदरे आणि कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांची आणि त्यांच्या साहित्याची माहिती दिली. वाचनालय कोणाचीही जात, धर्म, प्रांत, गट, तट, पक्ष न पाहता साहित्याचा कस पाहून एका स्वतंत्र समितीमार्फत हे पुरस्कार जाहीर करते असे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे प्रा. गांधी यांचा परिचय वाचनालयाचे संचालक अनिल धोंड्ये यांनी करून दिला. कैलास गांधी यांना कार्याध्यक्ष इंगवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यानंतर लेखक धनाजी घोरपडे यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितासंग्रहाची संचालक राष्ट्रपाल सावंत यांनी माहिती सांगितली. धनाजी घोरपडे यांना कविवर्य द्वारकानाथ शेंडे ‘मृदंगी ‘ पुरस्काराने सन्मानित केले. घोरपडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आजचा पुरस्कार पद्मश्री पुरस्कारासारखाच वाटतो. आपल्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले.

दुसरा पुरस्कार द्वारकानाथ शेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजय जोशी यांच्या ‘वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र’ या पुस्तकाला देण्यात आला. या पुस्तकाची माहिती लेखक संतोष गोणबरे यांनी सांगितली. विजय जोशी यांना कविवर्य द्वारकानाथ शेंडे ‘समीक्षा’ पुरस्काराने सन्मानित केले. जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निरपेक्षपणे आणि निपक्षपातीपणे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आदराने उल्लेख करून वाचनालयाचे आभार मानले.

प्रा. सुहास बारटक्के यांच्या कथाविविधा संग्रहाची माहिती संचालिका स्वरदा कुलकर्णी यांनी दिली. सुहास बारटक्के यांना ‘कवी माधव’ पुरस्काराने सन्मानित केले गेले. आपल्या मनोगतामध्ये बारटक्के यांनी गावामधील ज्या वाचनालयाने लिहायला, वाचायला शिकवले अशा सांस्कृतिक केंद्राने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा असल्याचे सांगितले.

प्रा. अविनाश बापट देवगड यांची आणि त्यांच्या ‘शापित हवेली’ या कथासंग्रहाची माहिती संचालक संजय शिंदे यांनी उपस्थित श्रोत्यांना करून दिली. यातील सर्व कथा मालवणी भाषेत असल्याचे सांगून काही कथांची थोडक्यात माहिती दिली.

अविनाश बापट यांना कवी आनंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये बापट यांनी आज माझ्या आयुष्यातील कपिलाषष्ठीचा योग असल्याचे सांगितले.

कादंबरीकार श्रीकांत पाटील कोल्हापूर यांची आणि त्यांच्या ‘ऊसकोंडी’ कादंबरीची माहिती प्राध्यापिका अंजली बर्वे यांनी वर्तमानातील उदाहरणे देऊन विषद केली. श्रीकांत पाटील यांना द्वारकानाथ शेंडे ‘मनबोली ‘ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे सांगून निवड समिती आणि वाचनालयाचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गांधी यांनी आपल्या मनोगतामध्ये शेरोशायरी ऐकवल्या. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या साहित्याचा आणि वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला. वाचनालयाने आपल्याला सन्मानित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी तर आभार विनायक ओक यांनी मानले. या कार्यक्रमाला दिशा दाभोळकर, सुनील टेरवकर, कवी सुदेश मालवणकर, कवी सुनील कदम, संचालक, सभासद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button