
रत्नागिरी पोलिसांची माणुसकी, एक दिवसाच्या पोलीस बांधवांच्या पगारातून रत्नागिरी जिल्हा पोलीसांनी “मुख्यमंत्री सहायता निधी” साठी ₹10,62,095/- चे दिले योगदान.
रत्नागिरी पोलिसांनी आपल्या कर्तव्यांबरोबर सामाजिक बांधिलकी ही जपली आहे नुकतेच राज्यातील मराठवाडा व विदर्भ येथील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती मुळे अतोनात नुकसान झालेले आहे. या झालेल्या नुकसानाबाबत सामाजिक जबाबदारी आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्याप्रती असलेल्या बांधिलकीच्या नात्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मराठवाडा व विदर्भ येथील नैसर्गिक आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून “मुख्यमंत्री सहायता निधी” साठी रु 10,62,095/- (दहा लाख बासष्ट हजार पंच्याण्णव रूपये) इतकी रक्कम सुपूर्द केली आहे. या रकमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे रत्नागिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते थेट सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, ना. डॉ. उदय सामंत, मंत्री उद्योग, मराठी भाषा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, राज्याचे गृह राज्य मंत्री श्री. योगेश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
ही रक्कम जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःच्या एक दिवसाच्या वेतनातून स्वेच्छेने दिलेल्या योगदानातून जमा करण्यात आली आहे.




