
सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचा वार्षिक स्नेहमेळावा आणि सर्वसाधारण सभा संपन्न
रत्नागिरी : येथील सारस्वत स्नेहवर्धक मंडळाच्या ज्ञातीबांधवांचा स्नेहमेळावा तसेच मंडळाची वार्षिक सभा रंजन मंदिर हॉल, शिर्के हायस्कूल येथे नुकतीच संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सारस्वत ज्ञातीतील दिवंगत झालेल्या ज्ञात-अज्ञात अशा व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर योगामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूर्वा शिवराम किनरे, तायक्वांदो क्रीडा प्रकारात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके आणि सुवर्ण कामगिरी करणारी स्वरा विकास साखळकर, अत्यंत मनाची अशी ‘एफएसीआरएसआय’ ही फेलोशिप देशात प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदकासह प्राप्त करणारे रत्नागिरीतील विख्यात सर्जन डॉ. सुश्रुत प्रमोद तेंडुलकर, यावर्षीचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा मानाचा असा ‘कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आलेल्या सौ. स्नेहा दत्तात्रय साखळकर आणि क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल ‘एसएनडीटी विद्यापीठाचा पुरस्कार’ प्राप्त करणारे मिलिंद तेंडुलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, भेटवस्तू, शाल, शिफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे विविध परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये तपस्या गुरुप्रसाद बोरकर, वेदांग नितीन कुलापकर, अनिका विकास करमरकर, आयुष निलेश सामंत, गायत्री कैलास किनरे, पार्थ प्रफुल्ल बोरकर यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र, भेटवस्तू, रोख रक्कम आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर यांनी सर्व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटकर होते. मंडळाच्या वतीने मागील सभेचे इतिवृत्त, वार्षिक जमाखर्च आणि पुढील अंदाजपत्रक सभेसमोर ठेवण्यात आले. अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाची आतापर्यंतची कामगिरी आणि भविष्यातील नजरेसमोर असलेल्या मंडळाच्या विविध बाबींचा विस्तृत आढावा घेतला. मंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपली असल्याने या सभेमध्ये पुढील तीन वर्षांकरिता नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली; नवनियुक्त सदस्यांना सर्वांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. विस्मया कुळकर्णी यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रदीप तेंडुलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या स्नेहमेळाव्याला रत्नागिरी शहरातील सारस्वत ज्ञाती बंधू-भगिनी आणि युवावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.




