
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ आणण्यात येणार
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ आणण्यात येणार आहेत.वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अभ्यासानुसार सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पात सध्या २० वाघ व्यवस्थित राहू शकतील इतकी जागा आहे. या प्रकल्पात आतापर्यंत कोयना प्रकल्पात १ आणि चांदोली परिसरात २ असे ३ वाघ ट्रॅप झाले आहेत. चौथा वाघ कोकणपट्ट्यात आढळून येतो.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटात स्थित एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे, जो २००८ मध्ये स्थापन झाला. हा प्रकल्प केवळ वाघांसाठीच नव्हे तर बिबट्या, गवा आणि इतर अनेक दुर्मीळ वनस्पती व प्राण्यांसाठी देखील एक सुरक्षित निवासस्थान आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट वन्यजीव आणि मानवी जीवनात संतुलन राखणे हे आहे, ज्यासाठी काही गावांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. ४ हजार ५०० चौ. कि. मी. क्षेत्रात हा प्रकल्प विस्तारलेला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ आल्याने त्यांची संख्या ९ होईल. अजून ११ वाघ प्रकल्पात सहज राहू शकतात.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक स्थलांतर करुन वाघ येतो; परंतु तिथे स्थिरावत नसल्याचा अनुभव आहे. तीन वर्षांपूर्वी येथे ५० चितळ सोडण्यात आली होती. चितळांची संख्या वाढेल, असे नियोजन वन विभागाने केले आहे. जेणेकरून वाघांचे नैसर्गिक खाद्य तयार होईल. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ आल्यानंतर येथील गव्यांपासून मानवी वस्तीतील त्रासही कमी होण्यास मदत होणार आहे. गवा हे वाघाचे नैसर्गिक आणि आवडते खाद्य असल्याने गव्यांची संख्या मर्यादित राहण्यासही मदत होईल. मात्र प्रकल्पात उरलेल्या गावांचे पुनर्वसन करून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.




