
शेतकरी कर्जमाफी, आ. बच्चू कडू यांची आंदोलनाची नांदी १३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहरातून होणार
शेतकर्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन विसरलेल्या आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकडे गंभीरपणे दुर्लक्ष करणार्या राज्य सरकारविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला आहे. विस्मरणात गेलेल्या सत्ताधार्यांना जागे करण्यासाठी त्यांनी थेट नागपूर येथील विधानसभेला घेराव घालण्याचा निर्धार केला आहे. या भव्य आंदोलनाची नांदी १३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहरातून होणार आहे.
यासंदर्भात रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात माहिती देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या ठाणे जिल्हाप्रमुख काजल नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली, नाईक यांनी सरकारच्या प्राथमिकतेवर सडकून टीका करताना म्हटले की, बच्चू कडू यांनी आता आपली लढाई आपणच लढायची आहे. या भूमिकेतून नुकताच राज्यातील ३६ जिल्ह्यांचा झंझावाती दौरा पूर्ण केला. या दौर्याचा समारोप १३ ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार आहे. मेळाव्यापूर्वी कडू यांचा गणपतीपुळे येथे आगमन व नांदिवडे येथे सत्कार सोहळा होणार आहे. तसेच जिंदल कंपनीने उभारलेल्या टर्मिनलची पाहणीही करतील. १३ ऑक्टोबर रोजी कर्जमाफी आणि नैसर्गिक नुकसानीसोबतच आंबा मच्छिमार, पर्यटन आणि दिव्यांगांच्या स्थानिक प्रश्नावर मार्गदर्शन करतील. विशेषतः जयगड जिंदल प्रकल्पाचा प्रश्न आणि बोगस एनओसी वापरून उभारलेल्या एनर्जी प्लांटमुळे गावकर्यांच्या त्रासाकडे होणारे दुर्लक्ष हे सत्ताधार्यांच्या पाठिंब्यामुळे होत असल्याचा गंभीर आरोप नाईक यांनी केला.www.konkantoday.com




