
रानडुक्करांकडून भातशेतीचे प्रचंड नुकसान
पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भात कापणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र कापणीयोग्य झालेल्या भाताची रानडुक्करांकडून नासधूस होत आहे. लोंब्यांमध्ये दाणे भरू लागले असून त्यावर रानडुक्कर कळपाने हल्ला मारत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील उमेश रहाटे यांच्या सव्वादोन एकर क्षेत्रापैकी एकर क्षेत्रातील भात रोपांचे नुकसान झाले आहे.
या परिसरातील कोंडवाडी, मिरवणे, उभे पाटवाडी परिसरातीलही भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकर्यांनी ३ महिने घेतलेली मेहनत आणि शेतीवर केलेला खर्च वाया गेला आहे. भगवतीनगर येथील शेतकरी उमेश रहाटे यांनी यंदा अडीच एकर क्षेत्रावर भातशेती केली होती. नांगरणी, बी-बियाणे, खते, लावणी, भात क्षेत्रातील साफसफाई आणि कापणी अशा विविध शेतीकामांसाठी यंदा त्यांना सुमारे २० हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता.www.konkantoday.com



