
रनप निवडणुकीच्या दृष्टीने मंगळवारी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
रत्नागिरी
पुढील कालावधीत होऊ घातलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षाकडून मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकीच्यादृष्टीने रणनितीवर चर्चा करण्यात येणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रभाग रचना सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. पुढील काही कालावधीत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रभाग निहाय आढावा घेतानाच काँग्रेस पक्षाकडून नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता काँग्रेस भवन येथे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर, जिल्हाध्यक्ष नुरुद्दिन सय्यद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक काद्री यांनी दिली.




