
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत १४ ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा
रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध जनतेने हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके
गुहागर : महाबोधी महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, सर्व बौद्ध आंबेडकरी संघटना, सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र आले असून १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भायखळा राणीबाग ते आझाद मैदान अशी मुंबईत शांततापूर्ण विराट रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बौद्ध, आंबेडकरी जनतेने मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे (स्थानिक) जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले, “बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान
बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या पूर्णपणे ताब्यात नाही. ज्या कर्मकांड पिंडदानाला अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते प्रकार महाबोधी महाविहार परिसरात होत असल्याने जगभरातील बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत. महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात नाही.त्यामुळे महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा १९४९ ज्याला बिटी ऍक्ट म्हटले जाते, तो बी टी ऍक्ट रद्द झाला पाहिजे. भारताचे संविधान२६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले असून त्यापूर्वीचा १९४९ चा बिहार विधानसभेचा बिटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे. महाबोधी महाविहार ट्रस्टमधील सर्व ९ सदस्य आणि चेअरमन हे बौद्ध असले पाहिजेत. प्रत्येक धर्माचे धार्मिकस्थळ त्या त्या धर्माच्या ट्रस्टकडे असतात.मग बौद्धांचे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? बौद्धांच्या बुद्धविहार ट्रस्ट मध्ये बौद्ध ट्रस्टी का नको? महाबोधी महाविहार बौद्धांचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “या व्यापक आंदोलनासाठी रिपब्लिकन नेते व आंदोलनाचे निमंत्रक ना. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नाना इंदिसे, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, अर्जुन डांगळे, अक्षय आंबेडकर, राजू वाघमारे, जयदेव गायकवाड, अविनाश महातेकर, राम पंडागळे, भाई गिरकर, संपादक कुणाल कांबळे, तानसेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर, सागर संसारे, दिलीप जगताप, सुनील निर्भवने, सुरेश केदारे, नितीन मोरे, मिलिंद सुर्वे, विलास रूपवते, रवी गरुड, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आकाश लामा, पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो, भदंत विरत्न थेरो, भदंत आयुपाल, भदंत शांतिरत्न, भदंत लामा आदी अनेक मान्यवर सर्व बौद्ध संघटना आणि रिपब्लिकन गटांचे नेते उपस्थित राहणार आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या रॅलीला ॲड. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांनाही संयोजकांमार्फत निमंत्रित करण्यात आले आहे.”
“रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटनांनी, आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष संघटनांनी, सामाजिक – धार्मिक संघटनांनी या मुंबईत होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,” असे आवाहन जिल्हा महासंघाच्या वतीने अध्यक्ष प्रीतम रुके व सरचिटणीस संदेश पवार यांनी केले आहे.




