
जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरला दुहेरी सुवर्णपदक
जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते पदक वितरण आणि सत्कार : शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संभाजीनगरला आज होणार रवाना
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२५/२६ एसव्हीजेटीसी क्रीडा संकुल डेरवण, सावर्डे येथे नुकत्याच पार पडल्या. या शालेय स्पर्धेमध्ये एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू आणि रत्नागिरीची सुवर्णकन्या स्वरा साखळकर हिने क्युरोगी प्रकारात ३८ किलो आतील वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे १२ व १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
रत्नागिरी जिंकलं, तर कोल्हापूर गाजवलं
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, जय किसान तरुण मंडळ वडणगे कोल्हापूर आयोजित शालेय विभागीय स्पर्धेत स्वरा साखळकरने आपला दबदबा कायम ठेवला. विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील ३८ किलो वजनी गटामध्ये स्वराने क्युरोगी प्रकारात सुवर्णपदक संपादन केले.
या दोन्ही स्पर्धेसाठी स्वरा हिला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक श्री. शाहरुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विभागीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये शाहरुख यांनी केलेली कोचिंग ही सुद्धा लक्षवेधी ठरली. स्वरा ही इयत्ता सहावीमध्ये शिकत असून रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १५ दामले विद्यालय शाळेची विद्यार्थिनी आहे. शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत एक सुवर्णपदक, तर विभागीय स्पर्धेत एक सुवर्णपदक असा दुहेरी सुवर्ण मुकुट मिळवणाऱ्या स्वरा हिची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिने मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, मुख्याध्यापक, पालक, क्रीडाशिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




