
रत्नागिरीत येथील साईनगर परिसरात चोरट्यांकडून तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न
रत्नागिरी शहर परिसरामध्ये चोरटे अजून सक्रिय आहेतच. बुधवारी दि. ८ रोजी रात्री साईनगर येथे चोरट्यांनी एका रात्रीत तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. या तीन घरांमध्ये एका लोकप्रतिनिधीच्या जुन्या घराचा समावेश आहे. चोरट्यांनी कुदळीने कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये कोणताही
मौल्यवान वस्तू न गेल्यामुळे त्याची तक्रार करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. राजापूर आणि खेडमध्ये घरफोड्या झाल्या होत्या. त्यानतंर रत्नागिरीतील छत्रपतीनगर येथे बंद बंगल्याची रेकी करून चोरट्यांनी तो फोडला. यामध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजाराची रोकड चोरट्यांनी लांबवली.
एवढ्यावर हे चोरटे न थांबता सलग दुसर्या दिवशी चोरट्यांनी शहराजवळील साईनगर येथे तीन बंद घरे फोडली. रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी आयरे यांच्या जुन्या घराचे कुलूप कुदळीने उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चव्हाण आणि कांबळे यांचेही घर फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचे धाडस म्हणजे एका घरचा दरवाजा देखील काढून टाकला आहे. याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र ते चोरट्यांचा माग काढू शकले नाहीत. परंतु या घटनेमुळे चोरटे अजून रत्नागिरी परिसरात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका रात्रीत झालेल्या या तीन घरफोड्यामध्ये कोणती मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे याबाबत कोणी तक्रार केलेली नाही. परंतु नागरिकांनी जागरूक राहून काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.www.konkantoday.com




