
मारुती मंदिर येथे सायकलस्वाराला धडक देऊन महिला कारचालक पसार झाल्याची तक्रार दाखल.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल ते नाचणे रोड दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात महिला कारचालकाने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली आणि मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात सायकलस्वार रघुनाथ बाबी झोरे (वय ४९) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास मारुती मंदिर सर्कलहून नाचणे रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर, व्यंकटेश हॉटेलच्या इमारतीसमोर घडला.
जखमी झालेले फिर्यादी रघुनाथ झोरे हे सायकलवरून खेडशी ते मारुती मंदिर या दिशेने जात होते. ते व्यंकटेश हॉटेलच्या समोर आले असता, मारुती मंदिर ते नाचणे रोड या दिशेने भरधाव वेगात आलेल्या एका कारने त्यांच्या सायकलला धडक दिली. अज्ञात महिला कारचालक आपली कार वेगात, हयगयीने आणि निष्काळजीपणाने चालवत असल्याने हा अपघात घडला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या धडकेमुळे रघुनाथ झोरे हे सायकलसह रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली.




