
बियाणे विक्रेत्यांसाठी ‘साथी पोर्टल फेज-२’ प्रशिक्षण संपन्न..
रत्नागिरी दि. 10 ):- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व परवानाधारक बियाणे विक्रेत्यांसाठी ‘साथी पोर्टल फेज-२’ या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, दापोली, खेड आणि मंडणगड बियाणे विक्रेत्यांसाठी नुकतेच प्रशिक्षण झाले. शासनाच्या नवीन नियमांनुसार, यापुढे सर्व प्रकारच्या बियाणांची विक्री ‘साथी पोर्टल’ या ऑनलाइन प्रणालीद्वारे करणे बंधनकारक झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे होते.
यामुळे बोगस आणि बनावट बियाणे विक्रीला संपूर्णपणे आळा घालणे. शेतकऱ्यांना केवळ प्रमाणित आणि उच्च गुणवत्तेचेच बियाणे मिळेल. बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक, विक्रेते आणि शेतकरी या सर्वांमध्ये पारदर्शक व्यवहार प्रस्थापित होतील. प्रत्येक बियाणे बँगेवरील क्यूआर कोडमुळे बियाण्याचा स्रोत, प्रकार आणि गुणवत्तेची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होईल. बियाणे व्यवसायातील सर्व प्रकारचे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल.
परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी अभिजीत गडदे आणि जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक रोहन चौथे यांनी उपस्थित विक्रेत्यांना ‘साथी पोर्टल’ची कार्यप्रणाली, बियाणांची नोंदणी आणि विक्री प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली व विक्रेत्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षणावेळी जिल्ह्यातील सर्व परवानाधारक बियाणे विक्रेत्यांना यापुढे सर्व प्रकारच्या बियाणांची विक्री केवळ ‘साथी पोर्टल’च्या माध्यमाद्वारे करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आभार प्रदर्शन कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) राजेंद्र कुंभार यांनी केले.




