दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळा संपन्नविविध शासकीय योजना व हक्कांची माहिती देण्यासाठी आयोजन


रत्नागिरी, दि. 10 ):- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ३९ नुसार दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आज संपन्न झाली.
जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सांस्कृतिक भवन येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते, गट विकास अधिकारी चेतन शेळके आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सर्व ठिकाणी दिव्यांगांसाठी असलेल्या सोयी-सुविधा त्यांच्यासाठी सहज उपलब्ध असल्या पाहिजेत. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क, कर्तव्ये आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोयी-सुविधा शेवटच्या दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.”
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी दिव्यांगांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “भारतात दिव्यांगांची संख्या लक्षणीय आहे आणि अनुवंशिकता किंवा अपघातामुळे दिव्यांगत्व येऊ शकते. मात्र, समान संधी आणि समान वागणूक मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यांना मदत करणे, मार्गदर्शन करणे आणि मानसिक आधार देणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.”
या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button