
जे जे रुग्णालयात तीन मिनिटांत मूळव्याध शस्त्रक्रिया!
मुंबई : जे जे रुग्णालयात मूळव्याधावर उपचारासाठी आता जर्मन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात चीरा किंवा टाके न लावता फक्त तीन मिनिटांत शस्त्रक्रिया केली जात आहे. गेल्या 11 दिवसांत या तंत्रज्ञानाचा वापर करीत 150 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्या वेदनारहित झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, डॉ. गिरीश बक्षी आणि डॉ. अमोल वाघ यांच्यासह तज्ज्ञांच्या पथकाने 26 सप्टेंबर रोजी जर्मनीतील कोलोन येथील एंडडर्माप्रॅक्सिस सेंटरमध्ये या प्रगत राफेलो रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्राचे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण डॉ. मेड. हार्टमुट शेफर आणि डॉ. कार्लो विवाल्डी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आणि एफ केअर सिस्टम्स एनव्हीद्वारे प्रमाणित करण्यात आले. त्यानंतर ही यंत्रणा जर्मनीतून आयात करण्यात आली असून जेजे रुग्णालयात तिचा वापर सुरू झाला आहे.
याबाबत अधिष्ठाता डॉ. भंडारवार यांनी सांगितले की, एफ केअर सिस्टम्स एनव्ही द्वारे प्रमाणित या तंत्रात उच्च-फ्रिक्वेन्सी लहरींद्वारे मूळव्याध ऊतींचे आकुंचन आणि निर्मूलन समाविष्ट होत आहे. ही एक डे-केअर उपचारपद्धती आहे. खासगी रुग्णालयांत या शस्त्रक्रियेसाठी 3.50 लाखांचा खर्च येतो. तर जर्मनीत साडेचार लाख. मात्र, जेजे रुग्णालयात याद्वारे आता मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
डे केअर म्हणजे उपचार
शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक डॉ. अमोल वाघ म्हणाले की, ही एक डे-केअर ट्रीटमेंट आहे. ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळ बेड रेस्टची गरज नाहीशी होते आणि त्याच दिवशी डिस्चार्ज दिला जातो. निवडक प्रकरणांमध्ये, डे-केअर मोडमुळे रुग्णांचा वेळ आणि मानसिक ताण दोन्ही कमी होतो. तथापि, प्रगत किंवा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये, क्लिनिकल निर्णयावर आधारित वेगळा प्रोटोकॉल स्वीकारला जातो.
प्रक्रिया अशी?
रुग्णाला स्थानिक भूल दिली जाते. मूळव्याध शोधल्यानंतर, गुदद्वाराच्या नलिकेत एक विशेष प्रोब घातला जातो. प्रोब मूळव्याध ऊतींना लक्ष्यित रेडिओफ्रिक्वेन्सी ऊर्जा पोहोचवते. ही ऊर्जा ऊतींना गरम करते आणि प्रथिने तोडते, ज्यामुळे मूळव्याध आकुंचन पावते. यामुळे मूळव्याध बरा होतो.
डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय रॅफेलो प्रक्रिया रेडिओफ्रिक्वेन्सीचा वापर करून सुरुवातीच्या टप्प्यात 100 ते 150 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. अंदाजे दोन तृतीयांश रुग्णांना कमीत कमी किंवा अजिबात वेदना होत नाहीत. मूळव्याध ऊतींचे आकुंचन करून समस्येचे निराकरण करते. ज्यामुळे चीरे आणि जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी होतो.




