
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा गुहागर बौद्धजन सहकारी संघटनेतर्फे निषेध
बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर व अंतर्गत धार्मिक संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जानवळे (ता. गुहागर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारोप समारंभ आयोजित केला होता. यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच हा हल्ला करणारा आरोपी राकेश किशोर या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि त्याची सनद कायमची रद्द करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.
वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभ व चर्चासत्र समारंभ बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश (दादा) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. चेअरमन एम. डी. मोहिते, उपाध्यक्ष अनिल सुर्वे, सरचिटणीस सुनील गमरे, सह चिटणीस दिलीप मोहिते, अध्यक्ष वसंत कदम, विश्वस्त शंकर मोहिते, मनीष गमरे, पराग सावंत, बौद्धजन सहकारी संघ संघटनेचे हिशोब तपासणीस अविनाश कदम,अंतर्गत धार्मिक संस्कार अध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव सुभाष जाधव, रवींद्र पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी वैभव गमरे (गुहागर), राकेश पवार (पेवे), मनोज गमरे (गिमवी), सुरेश जाधव (वेळंब), प्रभाकर मोहिते (पिंपर), सचिन पवार (शीर), विनोद यादव (कुडली) आदी पदाधिकारी यांच्यासह उपासक-उपासिका, बौद्ध बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव यांनी केले, तर आभार राकेश पवार यांनी मानले.




