
रामआळी, मारूतीआळी (बाजारपेठ) येथील रस्त्याच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रीटीकरणाया शुभारंभ झालेल्या कामाला स्थानिकांचा विरोध

रत्नागिरी शहरातील रामआळी, मारूतीआळी (बाजारपेठ) येथील रस्त्याच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रीटीकरणाया शुभारंभ झालेल्या काम थांबवून स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी रत्नागिरी नगरपरिषदेकडे बुधवारी धाव घेतली आहे. रस्ता विकासाला विरोध नसतानाही, पण तोंडावर आलेल्या दिवाळी आणि एकादशी या महत्त्वाच्या सणांच्या काळात काँक्रीटीकरणाचे काम सुरू करू नये, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. तातडीने बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घ्यावी, कामातील तांत्रिक बाबी समोर ठेवल्या जाव्यात, त्यानुसार काम केले जावे अशी कैफियत मांडण्यात आली आहे.
येथील महत्वाची बाजारपेठ असलेल्या रामआळी, मारूतीआळी तसेच अन्य भागातील व्यापारीवर्ग आणि येथील रहिवासी यांनी यासंदर्भात बुधवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे एक निवेदन या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाबाबत सादर केले. या निवेदनात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि लवकरच दिवाळी तसेच एकादशीचा मोठा बाजार भरणार आहे. या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. जर याच वेळी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले, तर दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागेल. त्यामुळे हे काम दिवाळी आणि एकादशीचा सण होईपर्यंत पुढे ढकलावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.




