
निवखोल-आंबेशेत रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक, कायमस्वरूपी उपाययोजना करा, नागरिकांची मागणी
रत्नागिरी नगर परिषदेने शासकीय रूग्णालय निवखोल-राजिवडा- आंबेशेत रस्त्यावर हॉट मिक्स पद्धतीने केलेले काम पावसाळ्यानंतर पूर्णतः निकामी ठरले असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आता केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करा, अन्यथा न.प. प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
गेल्या गणपती उत्सवात रत्नागिरी नगर परिषदेने सिव्हील हॉस्पिटल-निवखोल-राजिवडा- आंबेशेत येथील रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम झाले खरे पण ते अत्यंत अयोग्य पद्धतीने झाल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. आता या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. कामावर योग्य देखरेख नसल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे तीव्र शब्दात कैफियत मांडून लेखी अर्ज सादर केला आहे.
आता या रस्त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सध्या भरलेले खड्डे वाहतुकीसाठी अधिक धोकादायक बनले आहेत. तातडीने गुणवत्तापूर्ण दुरूस्ती करण्याची नागरिकांची मागणी केली आहे. रस्त्याला पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी योग्य गटार व्यवस्था नसल्यामुळेच रस्ता वारंवार खराब होतो. निवखोल घाटीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी इंजिनिअरिंग उपाययोजना करून कॉंक्रीटीकरण करावे. पार्वती निवासजवळील पडलेली दरड आणि रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेवून त्याठिकाणी तातडीने आरसीसीची मजबूत संरक्षक भिंत बांधावी. प्रशासनाने तसेच अभियांत्रिकी विभागाने या रस्त्याला दूरगामी दृष्टीने सर्व्हे करावा आणि त्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या प्रतिनिधीना सहभागी करून घ्यावे व गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.www.konkantoday.com




