
बचतगटातील महिलांच्या उत्पादनाला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद
दिवाळीचा उत्साह म्हणजे आनंद, रोषणाई आणि व्यापाराची पर्वणी. या हंगामात छोट्या उद्योगांसह महिला बचतगटांनीदेखील आपला ठसा उमटवला आहे. यंदा दिवाळीनिमित्त रत्नागिरीसह जिल्ह्यातील विविध महिला बचतगटांनी तयार केलेल्या फराळ, आकाशकंदिल, डेकोरेटिव्ह पणत्या आणि दिवाळी कीटला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या विक्रीमुळे बचतगटांच्या उलाढालीने लाखोंचा टप्पा ओलांडला असून महिलांच्या अर्थकरणाला यंदा दिवाळीत नवी झळाळी मिळाली आहे.
दिवाळीनिमित्त शहर आणि ग्रामीण भागातील अनेक महिला बचतगटांनी आपल्या हाताने बनविलेल्या पारंपारिक वस्तू विक्रीसाठी बाजारात आणल्या. फराळाचे पदार्थ, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, शेव यापासून ते रंगीत पणत्या, शोभिवंत आकाशकंदिल आणि पुजेसाठी लागणारे साहित्य या सर्व वस्तूंनी बाजारपेठ सजली होती. महिलांच्या या उत्पादनांना घरगुती गुणवत्ता आणि स्वदेशी स्पर्श असल्यामुळे ग्राहकांनी उत्स्फूर्त खरेदी केली.
www.konkantoday.com




