
आविष्कार संस्थेच्या विद्यार्थी विक्री केंद्राचे १४ ऑक्टोबरला उद्घाटन
रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळा आणि श्रीम. मीरा लिमये उत्पादन केंद्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये खास दीपावलीसाठी लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार करून त्यांची विक्री विद्यार्थी विक्री केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येते. यंदाही १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः निर्मिती केलेल्या वस्तूंची विक्री केली जाणार आहे.
या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, यांच्या हस्ते, तर यांचे उद्योजक विनय देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, मुख्य प्रवेशद्वार येथे होणार आहे. दि. १४ ते १७ ऑक्टोबर दरम्याने सायंकाळी ४ ते ९ या वेळेमध्ये हे विक्री केंद्र सुरू असणार आहे.
दिवाळीची चाहूल लागताच आविष्कार संस्थेत हस्तकलेतून साकार होणाऱ्या आणि दिवाळीसाठी उपयुक्त अशा वस्तू निर्मितीचे वेध लागतात आणि साकार होत जाते कलाकृती. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून श्री. शामराव भिडे कार्यशाळा या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करीत आलेली आहे. या वस्तू निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या अनेक कलागुणांना वाव मिळत असून विद्यार्थी प्रोत्साहित होताना दिसतात.
आविष्कार संस्था मतिमंदांच्या विकासासाठी गेली ३९ वर्षे करीत आहे. आविष्कार संस्थेच्या माध्यमातून सौ. सविता कामत विद्यामंदिर, श्री. शामराव भिडे कार्यशाळा, वर्षा चोक्सी बाल मार्गदर्शन केंद्र, कै. प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्र, श्रीम. मीरा लिमये उत्पादन केंद्र असे उपक्रम सध्या कार्यरत आहेत. प्रौढ दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देवून, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून एक उत्पादक घटक बनविण्याकरता श्री. शामराव भिडे कार्यशाळा गेली ३३ वर्षे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळा यश आले आहे. आज जवळपास ४४ विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन होऊन ते आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देवून त्यांना देखील स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
कार्यशाळा आणि श्रीम. मीरा लिमये उत्पादन केंद्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये खास दीपावलीसाठी लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार करून त्यांची विक्री करण्यात येते. विद्यार्थी विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः वस्तू निर्मिती केलेल्या वस्तू विक्री करत असतात. त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होऊन त्यांची पुढील कौशल्य विकसित होण्यासाठी मोलाचा मदत होत असते. कार्यशाळेमध्ये सध्या विविध प्रकारची हस्तकला, स्टेशनरी मेकिंग, शिवण, गृहशास्त्र, व्हाईट क्लीनर, अगरबत्ती मेकिंग, मेणबत्ती, ज्वेलरी असे विभाग कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची विक्री करून मिळणारा नफा विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून पुढील कौशल्ये विकसित होताना दिसत आहे. गेली १९ वर्षे विद्यार्थी विविध स्टॉलच्या माध्यमातून कलादानाच्या माध्यमातून स्वतः निर्माण केल्या वस्तू विक्री करत आहेत. याचीच प्रेरणा घेवून आज विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने उभे राहताना दिसत आहेत.
कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देत असतानाच प्रशिक्षणाचा काही भाग विद्यार्थी घरी नेऊन होम बेस अक्टिव्हिटी (Home Based Activity) अंतर्गत निर्मिती करीत आहेत. याचा फार मोठा उपयोग होऊन विद्यार्थ्यांचे कलागुणांना चालना मिळत आहे. यामध्ये पालकांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसून येत आहे.
आपल्या प्रियजनांना दिवाळीची खास भेट म्हणून दिवाळी गिफ्ट बॉक्स आणि गिफ्ट डिश देखील विक्रीसाठी उपलब्ध असून इतर वस्तू देखील संस्थेमध्ये विक्री करिता उपलब्ध आहेत. आविष्कार संस्थेच्या या विक्री केंद्राला भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्था अध्यक्ष बिपिन शहा, संस्था सचिव प्रा. डॉ. सोनाली कदम, कार्यशाळा समिती अध्यक्ष सिद्धेश वैद्य आणि व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी केले आहे.




