लेखक नारायण पाटणकर यांच्या अमृतानुभवचे रविवारी प्रकाशन

रत्नागिरी : येथील साहित्यिक, लेखक व अध्यात्मिक विचारवंत नारायण पाटणकर यांच्या अमृतानुभव या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (१२ ऑक्टोबर) सायंकाळी ४.३० वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालयात होणार आहे. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. चंद्रशेखर भगत आणि बहुआयामी व्यक्तिमत्व व ज्ञानेश्वरीचे अभ्यासक सुनील देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात रत्नागिरीतील हाडाचे सुप्रसिद्ध डॉक्टर आणि अध्यात्माचे अभ्यासक मिलिंद पटवर्धन, डॉ. दत्ताराम सातपुते, धनेश जुकेर, केतन केळकर, प्रकाशक रवींद्र घाटपांडे आणि पुणे येथील उद्योजक अशोक अत्रे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. नारायण पाटणकर यांचे अध्यात्मविषयक हे पंधरावे पुस्तक आहे. अमृतानुभव म्हणजे आत्म्याच्या अपरोक्ष अनुभूतीचे भातुके (पसायदान) अर्थात प्रसाद खाऊ अशा नावाने हा अमृतानुभव वाचकांसमोर येणार आहे. सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रथित केलेल्या अमृतानुभवाची ही एक प्रकारे सध्या प्रचलित असलेल्या मराठीतील फेरमांडणी आहे. अमृतानुभवाचे प्रकटीकरण आणि साक्षात्कार कसे घडले असावे याबाबत पाटणकर यांना झालेल्या साक्षातकारातून अमृतानुभवाचे लेखन झाले आहे. ही लेखन अथवा बौद्धिक कारागिरी नाही तर आतून उमलून उमाळा असलेले लेखन आहे. पुण्याच्या स्नेहल प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

या कार्यक्रमाला रत्नागिरीतील अध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ, अभ्यासकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. नीता पाटणकर आणि नारायण पाटणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button