
नाचणेतील श्री स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक, अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रातर्फे मराठवाडा पूरग्रस्त सेवा अभियान

रत्नागिरी : दिंडोरी प्रणित नाचणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक, अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राच्या वतीने मराठवाड्यातील पुरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली.

काही दिवसांपूर्वी मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले. अन्नधान्याने तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता या भागातील पूरपरिस्थिती ओसरली असली तरी मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे तेथील नागरिकांसाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा हात पुढे येत आहे.

रत्नागिरीतील नाचणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक, अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राच्या वतीनेही मराठवाडा पूरग्रस्त सेवा अभियान राबविण्यात आले. “मानव सेवा हीच स्वामी सेवा” हे ब्रीद बाळगून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य तसेच इतर आवश्यक असणाऱ्या वस्तू गोळा करून ही मदत नुकतीच मराठवाड्याच्या दिशेने रवाना करण्यात आली.
श्री स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक, अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राच्या सेवकांनी यासाठी मेहनत घेतली.




