
सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर चिपळूणच्या ‘हायटेक’ बसस्थानकाचे काम सुरू,वेळेत निधी मिळाला नाही तर पुन्हा काम बंद पडण्याची भीती
सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर चिपळूणच्या ‘हायटेक’ बसस्थानकाचे काम सुरू झाले आहे; मात्र राज्य सरकारकडून बसस्थानकाच्या कामासाठी पुरेसा निधी मिळालेला नाही. तो वेळेत मिळाला नाही तर पुन्हा काम बंद पडण्याची भीती आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली होती. ती तोडून त्या जागी नव्याने सर्व सोयीसुविधांनीयुक्त ‘हायटेक’ बसस्थानक उभारण्यास सहा वर्षांपूर्वी सुरवात झाली; मात्र ठेकेदाराने वेळेत काम सुरू केले नाही. अनेक अडचणींमुळे बसस्थानकाच्या बांधकामाचा बट्ट्याबोळ उडाला. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकाचे नूतनीकरण केले जात असताना चिपळूणच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम रखडले. शिवाजीनगरच्या बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला. त्यामुळे पावसाळ्यात चिपळूण आगाराचे काम शिवाजीनगर बसस्थानकावरून सुरू झाले. गणेशोत्सवासाठी चिपळुणात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय दूर झाली; मात्र विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पुन्हा सुरू व्हावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला; मात्र ठेकेदाराने कामाला सुरवात केली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला. त्यानंतर दुसरा ठेकेदार नेमण्यात आला. त्यानेही काम सुरू केले नाही. त्यामुळे त्यालाही बदलण्यात आले.परिवहन महामंडळाने दुसरा ठेकेदार रद्द केल्यानंतर उर्वरित कामासाठी २ कोटी ८७ लाख मंजूर करण्यात आले. त्यानंतर उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली. तेव्हा बसस्थानकाच्या कामाला तिसरा ठेकेदार मिळाला. गणेशोत्सवादरम्यान ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले होते; मात्र पाऊस प्रचंड असल्यामुळे कामाला सुरवात झाली नाही. दसऱ्यानंतर पाऊस कमी होताच ठेकेदाराने बसस्थानकाच्या कामाला सुरवात केली आहे. तिसऱ्या ठेकेदाराने रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी इमारतीच्या पायापासून सुरवात केली आहे. त्यासोबत इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅबचेही काम हाती घेण्यात आले आहे.




