
भिशीच्या माध्यमातून रत्नागिरीच्या दाम्पत्यांनी घातला कोल्हापूरकरांना लाखो रुपयाचा गंडा
मूळचे रत्नागिरी येथील असलेल्या दांपत्याने
राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनी परिसरातील भिशीमध्ये गुंतवणूक करणार्या सभासदांना 25 लाखांचा गंडा घालून फरार झाले आहे त्यांची नावे भिकाजी पंडित शिंदे, पत्नी प्राजक्ता भिकाजी शिंदे (रा. म्हाडा कॉलनी) अशी असून याच्या शोधासाठी राजारामपुरी पोलिसांची पथके रत्नागिरी व पुण्याला रवाना झाली आहेत.फसवणुकीचा आकडा दीड ते पावणे दोन कोटीवर असावा, असा संशय तपासाधिकार्यांनी व्यक्त केला.
राजेंद्रनगर परिसरात भिशी चालविणार्या दाम्पत्याने सभासदांची मुद्दल न देता गाशा गुंडाळून पलायन केल्याचे उघड झाले आहे. राजेंद्रनगर येथील राहत्या घराचीही दाम्पत्यांनी विक्री केल्याचे सभासदांतून सांगण्यात येत आहे. राजेंद्र आप्पासाहेब थोरवत (रा. म्हाडा कॉलनी, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केल्यानंतर फसगत झालेल्या सभासदांनी रविवारी सकाळी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांची दोन पथके वाडी शिरगाव (जि. रत्नागिरी ) व पुण्याकडे रवाना झाली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले.




