
भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर ‘ पत्र लेखन स्पर्धा”अंतिम मुदत 8 डिसेंबर
रत्नागिरी, दि. 7 ) : भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर ‘ पत्र लेखन स्पर्धा” दिनांक 8 सप्टेंबर ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये “लेटर आॕफ माय रोल माॕडेल” या थीम वरती आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि. 8 डिसेंबर 2025 अशी असून पत्र मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल ऑफिस, मुंबई 400001 या पत्त्यावर पाठविण्यात यावेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी / नागरिकांनी या मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक अ. द. सरंगले, यांनी केले आहे.
” सन 2017 पासून डाक विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर ‘पत्र लेखन’ स्पर्धा आयोजित केली जाते. राष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धा केवळ एक स्पर्धा नाही तर पत्र लिहिण्याची कला आहे. देशभरातील व्यक्तींना व्यक्त होण्याची ही एक संधी आहे, त्यांचे विचार, कल्पना आणि लेखन कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. वाचन, लेखन, भाषेचा वापर, टीकात्मक विचार आणि हस्तलेखन कौशल्य याची विद्यार्थ्यांच्या/ व्यक्तीच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका आहे. सध्याच्या डिजिटल युगाच्या वळणावरती पत्र लेखन कला मागे पडली असली तरी पत्रांना आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे.
स्पर्धेचा विषय, अटी व नियम खालील प्रमाणे आहेत-
स्पर्धेचा विषय “ Letter to My Role Model” ( आपल्या आदर्श व्यक्तिमत्वास पत्र ) असा आहे.
अटी व नियम – स्पर्धकाने स्वहस्ताक्षरात पत्र लिहायचे आहे, कोणताही भारतीय नागरिक यामध्ये भाग घेवू शकतो, मराठी /इंग्रजी / हिन्दी / कोणतीही स्थानिक भाषा, सदर स्पर्धेसाठी फक्त अंतर्देशिय पत्र /पोस्टाचा लखोटा/ साधा लखोटा (आवश्यक तिकीटे लावून ) यांचा वापर करावयाचा आहे. आंतर्देशिय पत्र किंवा ए-4 साईज कागदावरच पत्र स्वहस्ताक्षरात लिहावयाचे आहे. शब्दांची मर्यादा – आंतर्देशिय पत्र 500 शब्द आणि ए -4 साईज कागद 1000 शब्द असेल. वय 18 वर्षापर्यंत – a) आंतर्देशिय पत्र, एन्वलप (Envelope ), वय 18 वर्षावरील -a) आंतर्देशिय पत्र, एन्वलप (Envelope), “ I certify that I am below above the age of 18 as on 01.01.2025″ “मी असा दाखला देतो / देते की, दि. 01.01.2025 रोजी मी 18 वर्षावरील / वर्षाखालील गटात समाविष्ट होते /होतो ” असा दाखला सदरहू पत्रावर लिहिणे आवश्यक आहे.
पत्र पाठविण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर असून पत्र लेखन स्पर्धेची पत्रे जवळच्या पोस्टामध्ये पोस्ट करावीत. मुख्यपोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल ऑफिस, मुंबई 400001 यांच्या पत्त्यावर पत्र पाठवावीत.सर्कल स्तरावर प्रथम क्रमांक- रुपये 25000/- ( प्रत्येक प्रकारात), व्दितीय क्रमांक- रुपये – 10000/- ( प्रत्येक प्रकारात), तृतीय क्रमांक – रुपये – 5000/- ( प्रत्येक प्रकारात) बक्षिसे दिली जाणार आहेत.
सर्कल स्तरावरील 03 बक्षीसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार आहेत आणि त्यानंतर तेथे पुन्हा 03 नंबर काढण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक – रुपये 50000/- ( प्रत्येक प्रकारात), व्दितीय क्रमांक – रुपये 25000/- ( प्रत्येक प्रकारात), तृतीय क्रमांक – रुपये – 10000/- ( प्रत्येक प्रकारात) बक्षिसे दिली जाणार आहेत.




