
कलाशिक्षक रोशन गोताड यांचा ‘नमो-देवेंद्र जीवनरंग’ या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक
रत्नागिरी : तालुक्यातील खालगावचे रहिवासी आणि युवा कलाशिक्षक रोशन अर्जुन गोताड यांनी मुंबईत आयोजित केलेल्या ‘नमो-देवेंद्र जीवनरंग’ या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी आयोजित केलेल्या ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त‘च्या ‘नमो-देवेंद्र जीवनरंग‘ या स्पर्धेत त्यांनी हे यश संपादन केले.
या चित्रकला स्पर्धेसाठी मोदींजींचे व्हिजन‘ आणि ‘देवेंद्रजींचे नियोजन (मुंबईची सुरक्षा-मुंबईचा झालेला विकास)‘ असे विषय होते. दादर, मुंबई येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपयांचे भव्य पारितोषिक होते. जे रोशन गोताड यांनी आपल्या अप्रतिम चित्रकलेने जिंकले. रोशन गोताड यांनी त्यांचे कलाशिक्षक आणि जाकादेवी-तरवळ येथील सुपुत्र अर्जुन माचिवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले आहे.
या स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या ७० हून अधिक कलावंतांना मागे टाकून नमो-देवेंद्र जीवनरंग या प्रतिष्ठित स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. रोशन गोताड हे पोर्ट्रेट, लाईव्ह पेंटिंग, लँडस्केप, ब्लॅकबोर्ड आर्ट आणि कॅलिग्राफी यांसारख्या कलाप्रकारांमध्ये निपुण आहेत. तसेच, त्यांनी पी. एल. देशपांडे आर्ट गॅलरी आणि नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, स्टेट लेवल पोर्टेट पेंटींग लाईव्ह आदी प्रदर्शनांमध्येही सहभाग घेतला आहे. रोशन गोताड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रत्नागिरी जाकादेवी येथील बी.पी.के.के. महाविद्यालयातून एचएससी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुद्रा स्कूल ऑफ आर्टमधून डिप्लोमा शिक्षण घेतले. रोशन गोताड हे सध्या मुंबईत एन.जी.पी.एस.पी. गाकुल इंग्लिश स्कूल दहीघर येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कलाक्षेत्रातील मोठे योगदान स्पष्ट होते.
यापूर्वी त्यांना कॉलेज गोल्ड मेडल (२०२२), राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार (२०२२), आणि आर्ट व्हिजन राजा रवी वर्मा पुरस्कार (२०२३) यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याच वर्षी त्यांची ‘ग्रेट आर्टिस्ट (२०२४), राज्यस्तरीय ब्लॅक बोर्ड रायटींग कॉम्पिटीशन वुमन डे २०२५, राज्यस्तरीय गुणीजन कला पुरस्कार २०२५ यांनी सन्मानित करण्यात आले आहे.




