मुंबई गोवा महामार्गाच्या कामात १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू आणि महामार्ग रोखू,”, चिपळूण मध्ये काँग्रेसचा इशारा

मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाची कामे, निकृष्ट दर्जाची गटारे आणि फूटपाथच्या दुरवस्थेविषयी चिपळूण शहर काँग्रेसने शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला. ठेकेदारांशी हातमिळवणी करून वेळकाढूपणा करणाऱ्या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग आणि तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अचानक महामार्ग विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वाढलेली झाडी, गवत, कोसळलेली गटारे आणि फूटपाथवरील अडचणींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

उड्डाणपुलाचे कामही अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून, यंत्रणा वाढवून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी काँग्रेसने यापूर्वीही केली होती. मात्र, अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. “दरवेळी नवीन अधिकारी मी माहिती घेऊन सांगतो असे सांगतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही,” असा आरोप नेत्यांनी केला.

“आता जनतेला सोबत घेऊन थेट महामार्गावर उतरू. १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू आणि महामार्ग रोखू,” असा इशाराही काँग्रेसने दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button