मराठी माणसाच्या टाळूवरंच लोणी खाणारे परब यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे- रामदास कदम

अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केल्यानंतर आज पुन्हा कदम यांनी पत्रकार परिषद घेत परब यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. बाळासांहेब ठाकरेंच्या शेवटच्या दिवसांबाबत उद्धव ठाकरें यांनीच सांगावे, अनिल परब का बोलत आहेत? असा सवाल करत आमच्यावर परब यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत त्यांचीच नार्को टेस्ट झाली पाहिजे, मीच त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला आहे.

रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याचे मी स्वत: सांगितले, पण परब हे डॉक्टरांच्या टीमने आणि सर्व नेत्यांनी लोकांना ही माहिती सांगितल्याचे धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी त्या टीममधील डॉक्टरांची नावे सांगावीत. पण ते सांगू शकणार नाहीत कारण परब हे उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी बोलत आहेत. मी पुन्हा दाव्याने सांगतो की बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन दिवस कोणालाही त्यांच्या खोलीत जाऊ दिले नाही. पण लोकांसमोर जाऊन ही दु:खद बातमी सांगण्याची कोणाचीच हिंमत नव्हती शेवटी मी लोकांसमोर गेलो आणि बाळासाहेबांचे निधन झाल्याचे सांगितले.

बाळासाहेब ठाकरेंचे पार्थिव दोन दिवस खोलीत का ठेवले असा मी संशय व्यक्त केला, जर माझी मागणी योग्य असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टिकरण दिले पाहिजे, पण कारण बाळासाहेब त्यांचे पिता होते, पण अनिल परबच पुढे येऊन खोटी माहिती देत आहेत. कारण त्यांना ठाकरेंना खुश करायचं आहे. पण त्यांनी निदान जनाची नाही मनाची लाज राखली पाहिजे. परब म्हणतात की, मेलेल्या माणसाचे ठसे घेऊन काय करायचे, पण ते त्यानांच माहित. मी याबाबत तेव्हा उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवायला हवेत त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण त्यांच्या हाताचे ठसे घेतले आहेत आणि आता परब खोटे बोलत आहेत. असेही रामदास कदम यांनी सुनावले.

विलेपार्ले येथील एसआरएची योजना सुरू आहे. ती अजून पूर्ण झाली नाही. अनिल परब यांनी घर रिकमी करा म्हणून ८ हजार मराठी माणसांना दम दिला. उद्घाटन झालं त्यावेळी अनिल परब व्यासपीठावर होते. या ८ हजार लोकांना फक्त एक वर्षाचं भाडं दिलंअनिल परब यांनी मराठी माणसांना मुंबई बाहेर काढण्यासाठी एका बिल्डरकडून पैसे घेतले, त्याच्याकडून दोन मर्सिडीज घेतल्या, मराठी माणसाच्या टाळूवरंच लोणी खाणारे परब यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. बिल्डरच्या पैशातून बुलेट गाड्या वाटल्या हे माझं नाही कर तेथील रहिवाशांचे म्हणले आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे. ते आमच्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, कदम कुटुंबातील कुणीही आत्महत्या केलेली नाही. बाळासाहेबांनी स्वत: माझ्या पत्नीला वाचवले आहे. अन् तुम्ही कदम कुटुंबाची बदनामी करत आहात. परब यांच्या विरोधात माझ्या भावाचा मुलगा कोर्टात जाणार आहे. असेही रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button