
मराठा असोसिएशन जयंती २०२५ – तामिळनाडू
तामिळनाडूतील तंजावर येथे "मराठी भवन" उभारणार:- ना. उदय सामंत


आज तामिळनाडूतील तंजावर येथे आयोजित मराठा असोसिएशन जयंती २०२५ हा ऐतिहासिक कार्यक्रम महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधील संस्कृती, परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हे दोन्ही राज्यांना जोडणारे अतूट बंध आहेत, हे अधोरेखित करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले :-

दीपप्रज्वलनाच्या क्षणी महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे मंत्री एकत्र आले, ही दोन्ही राज्यांच्या एकात्मतेची आणि संस्कृतींच्या ऐक्याची जिवंत उदाहरण आहे. तामिळनाडू सरकारने दाखवलेला शिष्टाचार आणि आदरभाव हे या राज्याच्या संस्कृतीची उच्च परंपरा दर्शवतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती व्यंकोजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीशी महाराष्ट्राचे नाते हे शतकानुशतके अटळ आहे. भविष्यात तामिळनाडू सरकारसोबत मिळून तंजावर येथे एक भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रातील किमान ५,००० नागरिकांना तंजावरला आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारली आहे.
तंजावर येथे “मराठी भवन” उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज आहे, यासाठी तामिळनाडू सरकारकडून एक एकर जमीन मिळावी अशी विनंतीही यावेळी केली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार आणि विचार पुढे नेणे हीच खरी आपली जबाबदारी आहे, हा संदेशही दिला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही राज्यांमधील नाते आणखी दृढ झाले आहे. आपल्या सर्व मराठी बांधवांचा प्रेम, आत्मीयता आणि संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून मला अत्यंत अभिमान वाटला.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी तामिळनाडू सरकारला आणि सर्व मान्यवरांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.




